"135 क्विंटल धान्य तफावत" नांदाफाटा रास्त भाव दुकान कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी
"135 क्विंटल धान्य तफावत" नांदाफाटा रास्त भाव दुकान कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील नांदा फाटा येथील रास्त भाव दुकानातील कथित अनियमितता, धान्याचा काळाबाजार 135 क्विंटल धान्य तफावतीच्या प्रकरणात तातडीने अंतिम सुनावणी घेऊन रास्त भाव दुकान कायमस्वरूपी रद्द करावे, अशी मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. बहादुरकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
नांदा ग्रामपंचायत अंतर्गत नांदा फाटा येथे श्री. मनोज तुकाराम कुसराम यांच्या नावाने रास्त भाव दुकान आहे. सदर दुकानामध्ये यापूर्वीही अनियमितता व काळाबाजाराच्या तक्रारी झाल्याचा दावा करण्यात आला असून, दुकानावर तीन वेळा निलंबनाची तसेच चार वेळा दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, 15 मे 2025 रोजी पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री. विक्की देवघरे यांनी केलेल्या तपासणीमध्ये दुकानातील गहू व तांदळाच्या साठ्यात जवळपास 135 क्विंटल धान्य कमी आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. शासनाच्या धान्य साठ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात तफावत आढळणे ही गंभीर बाब असून, या कमी आढळलेल्या धान्याची बाजारभावाप्रमाणे रक्कम संबंधित रास्त भाव दुकानदाराकडून शासन नियमानुसार वसूल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तपासणीच्या अनुषंगाने पुढील कारवाईसाठी अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. त्यानंतर 9 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी अंतरिम आदेश पारित केला होता. मात्र या आदेशाला जवळपास 10 महिने पूर्ण होऊनही अद्याप अंतिम सुनावणी झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अंतरिम आदेशामध्ये नांदा फाटा रास्त भाव दुकानाशी संबंधित मागील तीन महिन्यांचे धान्य लाभार्थ्यांना विहित मुदतीत वितरित करण्यात आले होते किंवा नाही, याबाबत तहसीलदार, कोरपना यांना चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. विशेषतः फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल 2025 या तीन महिन्यांतील धान्य वितरणाची खातरजमा करणे आवश्यक होते. मात्र या बाबत अपेक्षित चौकशी झाल्याचे दिसून येत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच सदर रास्त भाव दुकानाशी संबंधित 100 टक्के शिधापत्रिकाधारकांची स्वतंत्ररीत्या बयाणे नोंदवून, प्रत्यक्षात लाभार्थ्यांना किती धान्य वितरित करण्यात आले आणि किती धान्याचा अपहार झाला, याची वस्तुनिष्ठ माहिती घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर विगतवारीसह सविस्तर अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयास सादर करावा, अशीही मागणी आहे.
निवेदनात पुढे असा आरोप करण्यात आला आहे की, रास्त भाव दुकान श्री. मनोज तुकाराम कुसराम यांच्या नावावर असले तरी ते स्वतः दुकान चालवीत नसून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमध्ये ठेकेदारीचे काम करतात. त्यांचे बंधू शैलेंद्र कुसराम हे दुकान चालवित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सन 2014 ते 2026 या कालावधीत सदर दुकानासंदर्भात झालेल्या तक्रारी, चौकश्या, निलंबन व दंडात्मक कारवाईची संपूर्ण माहिती पुरवठा विभागाकडे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून संबंधित रास्त भाव दुकानावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अंतिम सुनावणी तातडीने घेऊन नांदा फाटा येथील रास्त भाव दुकान कायमस्वरूपी रद्द करावे, 135 क्विंटल धान्याच्या तफावतीची बाजारभावाप्रमाणे रक्कम संबंधित दुकानदाराकडून शासन नियमानुसार वसूल करून येथील रास्तभाव दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे
रेशन दुकानाच्या तपासणीत शिल्लक साठ्यामध्ये जवळपास 135 क्विंटल गहू व तांदूळ कमी आढळले यामुळे तात्काळ दुकान काढून घेण्यात आले व कारवाईसाठी प्रकरण जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले होते जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कारवाई न करता अंतरिम आदेश करीत लाखो रुपयांचा काळाबाजार करणाऱ्या रास्त भाव दुकानाला परत दुकान जोडून पुरस्कृत केले आहे. अधिकारीच भ्रष्ट रेशन दुकानदाराला पाठीशी घालत असेल तर कारवाई कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. - अभय मुनोत, माजी ग्रामपंचायत सदस्य, नांदा
बातमी संकलन - सतीश जमदाडे, नांदा फाटा



कोणत्याही टिप्पण्या नाहीत