आश्रमशाळेतील ३१ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली; अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी,,, कुलदिप चंदनखेडे जिल्हा उपाध्यक्ष मनविसे
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी शेख हक्कानी, चंद्रपूर : जिवती तालुक्यातील नगराळा येथील श्री अंब्रु नाईक माध्यमिक आश्रम शाळेत दि. १ सप्टेंबर रोजी दुपारचे जेवण घेतल्यानंतर प्राथमिक विभागातील ४ व माध्यमिक विभागातील २७ असे एकूण ३१ विद्यार्थ्यांची अचानक प्रकृती बिघडल्याची गंभीर घटना घडली. विद्यार्थ्यांना उलट्या, पोटदुखी, मळमळ आदी त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने राजुरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असले तरी, एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्राथमिक माहितीनुसार शाळेतील स्वयंपाकामध्ये पाल पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, घटनेचे नेमके कारण अधिकृत तपासणी, वैद्यकीय अहवाल आणि अन्न नमुन्यांच्या प्रयोगशाळा तपासणीनंतरच स्पष्ट होणे आवश्यक आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनामध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या अन्नाचे नमुने तातडीने ताब्यात घेऊन मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणी करावी, विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी वैद्यकीय व प्रशासकीय चौकशी करावी, तसेच निष्काळजीपणा अथवा नियमभंग आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी, स्वयंपाकी किंवा जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर व विभागीय कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच जिवती तालुक्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये अन्नाची गुणवत्ता, स्वयंपाकगृहांची स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि अन्नधान्य साठवणूक व्यवस्थेचे विशेष ऑडिट करण्यात यावे. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाचे नमुने नियमानुसार जतन केले जात आहेत की नाही, याचीही तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत नियमित अन्नसुरक्षा व आरोग्य तपासणीची व्यवस्था करण्यात यावी. तसेच सदर प्रकरणातील चौकशीचा अहवाल आणि करण्यात आलेल्या कारवाईची माहिती पालक व नागरिकांना देण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
“विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या आरोग्याशी व जीविताशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. या घटनेची शासन व प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन सत्य समोर आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी उपस्थित मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, रूग्ण मित्र कृष्णा गुप्ता, तालुका उपाध्यक्ष प्रविण शेवते, शहर उपाध्यक्ष पियूष धुपे, सागर बेरड, राजु देवांगन आणि मनसे सैनिक उपास्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत