Breaking News

तीन-चार महिन्यांतच उघडी पडली सीसी रस्त्याची गिट्टी;

नगराळा–जिवती मार्गावरील कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी चंद्रपूर, जिवती :- जिवती तालुक्यातील नगराळा–जिवती मुख्य मार्गावरील गडपांढरवाणी गावाजवळ अंदाजे सुमारे अडीचशे मीटर लांबीचा सिमेंट काँक्रिट (सीसी) रस्ता अवघ्या तीन ते चार महिन्यांपूर्वी बांधण्यात आला. मात्र, इतक्या कमी कालावधीतच या रस्त्यावरील गिट्टी उघडी पडू लागल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या पृष्ठभागावरील सिमेंटचा थर झिजून अनेक ठिकाणी गिट्टी स्पष्टपणे दिसू लागली आहे. यामुळे संबंधित कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याची चर्चा तालुकाभर सुरू असून, कामाच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, या रस्त्याच्या ठिकाणी कोणत्या योजनेच्या अथवा निधीच्या माध्यमातून काम करण्यात आले, कोणत्या बांधकाम विभागाने हे काम मंजूर केले, कामाचा हमी कालावधी किती आहे तसेच संबंधित कंत्राटदार कोण आहे, याबाबत माहिती देणारा फलकही लावण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून कामातील पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अवघ्या काही महिन्यांतच रस्त्याची अशी अवस्था झाल्यामुळे संबंधित विभागाच्या देखरेखीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. सार्वजनिक निधीतून करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये दर्जेदार बांधकाम होणे अपेक्षित असताना या कामात निष्काळजीपणा झाला का, याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

गडपांढरवाणी परिसरातील नागरिकांनी या सीसी रस्त्याची तांत्रिक तपासणी करून कामाच्या गुणवत्तेची चौकशी करावी, दोषी आढळल्यास संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी तसेच आवश्यक असल्यास रस्ता पुन्हा दर्जेदार पद्धतीने दुरुस्त करून नागरिकांना सुरक्षित व टिकाऊ सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत