Breaking News

तहसीलदाऱ्यांची पारधी समाजाच्या दहेगाव वस्तीला भेट

 तहसीलदाऱ्यांची पारधी समाजाच्या दहेगाव वस्तीला भेट

महा घडामोडी न्यूज नागपूर : फासे पारधी समाजाचा मूळ व्यवसाय म्हणजे शिकार करणे. मात्र, शासनाने शिकारीवर बंदी घातल्याने या सामाजातील लोकांपुढे दोन वेळेचे पोट कसे भरायचे? हा प्रश्न निर्माण झाला. त्यांनी १९९४ पासून पडीक शेतजमिनी वाहतीत आणून शेती करणे सुरू केले.मरणाऱ्या माणसाला पाणी आणि जागा मिळू शकते तर, जिवंत माणसाला का नाही? असा प्रश्न फासे पारधी समाज बांधवांकडून उपस्थित केला जात आहे.

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करित असताना फासे पारधी समाज आजही मूलभूत सुविधांपासूनही वंचित आहे.प्रगत विज्ञान अवघ्या सृष्टीला गवसनी घालतो आहे. मात्र, फासे पारधी समाजाचे गाव आजही देशाच्या नकाशावर नाही. विशेष म्हणजे, फासे पारधी या सामाजातील हजारो लोकांना ७४ वर्षांनंतरही मतदान करण्याचा अधिकार मिळालेला नाही.

गावाचा दर्जा मिळाला नसल्याने या गावातील सर्वच नागरिक मतदान, आधारकार्ड, रहिवाशी दाखला आणि शासनाच्या विविध सोयीसुविधांपासून वंचित आहेत. गावात रस्ते नाही, शाळा नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. जीवन जगत असताना पारधी समाजाला चांगलीच कसरत करावी लागते आहे.

देश स्वातंत्र्य होण्याआधी इंग्रजांनी गुन्हेगारी जमात म्हणून कपाळावर मारलेला शिक्का आजतागायत त्यांच्या कपाळावरून पुसल्या गेलेला नाही. त्यामुळे या लोकांची अवस्था ना घर का, ना घाट का अशी झाली आहे. फासे पारधी सामाजातील हजारो लोक आजही संविधानिक हक्कांपासून वंचित आहे.

आजही फासे पारधी सामाजातील वस्त्यांमध्ये शेकडो नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेला नाही. अनेकांकडे आधार कार्ड नाही,फासे पारधी बांधवाकडे शासकीय कागदोपत्री अभावी आदिवासी विकास विभाग आणि इतर विविध शासकीय योजनाचा लाभ ही मिळेना .

आधूनिकतेमुळे व्यवसायावर गदा आल्याने आर्थिक परिस्थीती सोबतच शैक्षणिक विकासाची गती देखील मंदावली आहे. मागील 35 वर्षांपासून विविध समस्यांचा सामना करत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या उमरेड  तालुक्यातील दहेगाव येथील पारधी समाजाच्या वस्तीवर उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत, तहसीलदार संदीप पुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रदीप वरपे  पोहोचले. तहसीलदाऱ्यांच्या या भेटीमुळे फासे पारधीच्या वस्तीचे भाग्य पालटणार आहे.

गावोगावी जाऊन भीक मागून जगणाऱ्या आदिवासी पारधी समाजाच्या समस्या, अडचणी व प्रश्न जाणून घेण्यासाठी या पाड्याला भेट देणारे ते पहिले अधिकारी आहेत. जमिनीचे पट्टे, घरकूल, आधार कार्ड, पिण्याचे पाणी, हाताला रोजगार, आरोग्य व मुलांचे शिक्षण यासह विविध समस्या त्यांनी जाणून घेतल्या.  नायब तहसीलदार प्रदीप वरपे,सोबत असलेले चांप्याचे सरपंच अतिश पवार, पत्रकार अनिल पवार  व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

दहेगाव वस्तीच्या ठळक समस्या

  • जमिनीचे पट्टे • घरकुलाचा लाभ • पिण्याच्या पाण्याचा प्रश्न • महिलांना स्वयंरोजगार • जात पडताळणी • रेशनकार्ड द्यावे (बीपीएल) • आधार कार्ड मिळावे • रोहयोची काम मिळावी • उज्वला गॅस योजनेचा लाभ • संजय गांधी निराधार योजना •

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत