Breaking News

माणसे तडफडू लागली, लोकशाही रडू लागली !



डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांचे हाल, शेखचिल्ली पद्धतीने नोटाबंदी केल्यामुळे बँकेच्या रांगेत उभे राहिलेल्या लोकांचे हाल, अविवेकी पद्धतीने लॉक डाऊन जाहीर केल्यामुळे छोट्या छोट्या मुलांना घेऊन गरीब मजुरांना करावा लागलेला हजारो किलोमीटरचा जीवघेणा पैदल प्रवास, त्यात तडफडून तडफडून मरणारे असहाय जीव, शेतकऱ्यांच्या आंदोलनात शहीद झालेले ७०० शेतकरी, पुलवामा हमल्यात शहीद झालेले ४४ जवान आणि अजूनही त्याची न झालेली चौकशी.. ही सारी लक्षणे कशाची आहेत ? आपली लोकशाही कसल्या धर्मसंकटात सापडली आहे ? कौरवांच्या तावडीत सापडलेल्या द्रोपदीची अवस्था त्यावेळी नेमकी अशीच असेल का ?

तीन पांडवांच्या मूर्खपणामुळे एवढे महाभारत घडले. धर्मराज, अर्जुन, भीम यांनी मूर्खपणा केला, स्वतःची अक्कल गहाण ठेवली आणि महाभारत घडले. नकुल, सहदेव यांनी योग्य भूमिका घेतली नाही आणि महाभारत घडले. भीष्माचार्य, द्रोणाचार्य यांनी माती खाल्ली म्हणून महाभारत घडले. श्रीकृष्ण बेसावध राहिला आणि महाभारत घडले. कौरव तर शेवटी कौरवच होते. त्यांना एकतर्फी दोष देऊन काय फायदा ? सारी सत्ता तीन - चार माकडांच्या हातात एकवटली आणि महायुद्ध घडले !

वर सांगितलेली एक एक घटना हा सरकारची दिवाळखोरी आणि नाकर्तेपणा यांचा पुरावा आहे. सरकार कुणाचेही असो, अशावेळी आम्हाला संताप आला पाहिजे, चीड आली पाहिजे. या अनर्थाला जे जे जबाबदार असतील, त्यांच्या तोंडावर थुंकण्याची इच्छा झाली पाहिजे. अशांना सत्तेतून हाकलून देण्याची लाट साऱ्या देशातून उसळली पाहिजे. लोकशाहीला लागलेले हे ग्रहण कसे दूर होईल याचा विचार जनतेने गांभीर्याने केला पाहिजे. पण आपल्या देशात सारे उलटे सुरू आहे. स्वतःच्या नाकर्तेपणाची लाज वाटण्याऐवजी त्याच आधारावर मते मागणारी कोडगी संस्कृती प्रतिष्ठित झालेली आहे. द्रौपदीच्या माहेरच्या लोकांनी दुर्योधन, दुःशासन यांचा भव्य सत्कार आयोजित करावा, तसा मूर्खपणा आम्ही बघत आहोत. खुश होत आहोत. एन्जॉय करत आहोत. टाळ्या वाजवत आहोत. द्रौपदी वस्त्रहरणाच्या क्लिप्स पुन्हा पुन्हा दाखवणारे विविध चॅनेल त्यासाठी तयारच आहेत. त्यांना फक्त माल हवा. त्यासाठी आपल्या मुख्य कार्यालयाचे म्हणा किंवा घराचे म्हणा, कुंटणखान्यात रूपांतर करायला देखील हे लोक तयार आहेत. रांडा, भडवे आणि अँकर यातला फरक इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील काही लोकांनी पार मिटवून टाकला आहे. मोजक्या अपवादांच्या भरवश्यावर देश अजून टिकून आहे, बातम्या जिवंत आहेत. तेवढाच एक आशेचा किरण आहे. नोटबंदी मधून पैदा झालेले नवे कौरव प्रायोजक म्हणून थैल्या घेऊनच बसलेले आहेत.

आमच्या देशाचा विमान वाहतूक लाचार मंत्री तिकडे जाऊन विद्यार्थांना मदत केल्याचा आव आणत आहे. त्याला तिथल्या महापौरांनी सरळ सरळ शाब्दिक जोडे मारल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे ? ’तुम्ही कशाचे क्रेडिट घ्यायला इथे आलेले आहात ? तुमच्या विद्यार्थ्यांची तुम्ही काय काळजी घेतली ? आम्ही त्यांना अन्नपाणी दिले ! आसरा दिला ! ह्यात तुमचे काय योगदान आहे ?’ असे चक्क त्याच्या तोंडावर आणि तेही विद्यार्थ्यांच्या समोर सुनवले गेले. हा प्राणी त त प प करत राहिला. 

अद्वितीय ज्ञानाचा पुतळा असलेले आपले पंतप्रधान सात वर्षानंतरही काँग्रेसलाच दोष देताना दिसतात. देशात मेडिकल शिक्षणाच्या सोयी पुरेशा सोयी काँग्रेसने केल्या नाहीत, म्हणून विद्यार्थी बाहेर शिकायला जातात, असे बेधडक बोलतात. हा कोडगेपणाचा कळस आहे. यांनी स्वतः काय केले ? हे मंदिर आणि पुतळे ह्यात आपली अक्कल पाजळत राहिले, देशाची संपत्ती उधळत राहिले. सुमारे १६ वर्षे भाजपचे सरकार सत्तेत होते. आहेत. अडीच ३ वर्षे जनता पक्षाच्या काळातही हे लोक सत्तेत सहभागी होते ! त्या काळात यांनी किती मेडिकल कॉलेजेस काढली ? किती विद्यापीठं स्थापन केली ? काँग्रेसनं स्थापन केलेल्या एक एक संस्था हे लोक विकत आहेत, उध्वस्त करत आहेत आणि वरून काँग्रेसच्या नावाने बोंब मारत आहेत.

अर्थात् मेडिकल शिक्षणाच्या बाबतीत देशात जेवढे काम करायला हवे होते, तेवढ्या प्रमाणात केले गेलेले नाही, यासाठी काँग्रेस देखील जबाबदार आहे. अन्न, वस्त्र, निवारा या सोबतच शिक्षण आणि आरोग्य ह्या आजच्या मूलभूत गरजा आहेत. सरकार कुणाचेही असो, त्या दिशेने नियोजन केले पाहिजे. आपण ते देऊ शकलो नाही, याची किमान लाज तरी वाटली पाहिजे. किमान माणुसकी, किमान संवेदना, किमान सभ्यपणा, किमान लाजलज्जा ह्या गुणांचाही जर सरकारमध्ये अभाव असेल, तर त्याला सरकार म्हणायचे की टोळी ?

’शेतकरी माझ्यासाठी मेले का ?’ असं विचारणारा पंतप्रधान या देशाने पहिल्यांदा पाहिला आहे. ’विदेशात शिकायला जाता कशाला ?’ असं विचारणारे नमुने मंत्री या देशाला पहिल्यांदा पहायला मिळालेले आहेत. पाच किलो अनाज आणि किलोभर मीठ सरकारने गरिबांना दिले. त्या किलोभर मिठाची आठवण करून देणारा दरिद्री मानसिकतेचा नेता जगाच्या पाठीवर आजवर पैदा झाला नसेल. जणूकाही यांनी बाप कमाईतून देशाला मीठ पुरवले आहे ! आणि त्यासाठी मते मागतानाही या लोकांना काहीही वाटत नाही. कुठल्या जन्माचे भोग देशाच्या वाट्याला आलेले आहेत, माहीत नाही. निवडणूक आयोगाला तर लकवा मारलेला आहे. 

महागाई प्रचंड वाढलेली आहे. भ्रष्टाचार शिगेला पोचला आहे. जगणं असह्य झालेलं आहे. सरकार विरोधात प्रचंड आक्रोश आहे. पण मीडिया बोलत नाही. वृत्तपत्रे लिहीत नाहीत. राजकीय नेते घाबरून बिळात दडलेले आहेत. जनतेला कुणीही वाली राहिलेला नाही, असे भयाण चित्र देशात सर्वत्र दिसत आहे. या देशातील सारी जनता मोजक्या दहा पाच लोकांची गुलाम असावी, अशा थाटात हे लोक वावरू लागले आहेत. एकूणच चित्र भयंकर आहे.

माणसं तडफडत आहेत. लोकशाही रडत आहे. आणि आम्ही अजूनही शांत आहोत ! आमच्यातले फितूर हेच आम्हाला आमचे नेते वाटायला लागले आहेत. आम्ही एवढे मुर्दाड कसे काय झालो ? आम्हाला पुढच्या पिढ्यांची चिंता नाही का ? लोकशाहीच जिवंत राहिली नाही तर आम्ही तरी जिवंत राहू का ? एवढे स्वाभिमानशून्य जगणे काय कामाचे ? मग कुत्र्यामांजरात आणि आपल्यात काय फरक राहिला ? माणसा माणसात फूट पाडण्याचे षडयंत्र देशात सुरू आहे. उद्या देशाचे तुकडे व्हायची वेळ आली तरी आम्ही असेच शांत बसणार का ? आम्हाला लोकशाहीचे महत्त्व कळत नाही का ? आम्ही एवढे बिनडोक आहोत का ? आम्ही नेमके कुणाला घाबरतो आहोत ? का घाबरतो आहोत ?

हे सरकार मजुरांचं नाही. कामगारांचं नाही. गरिबांचं नाही, मध्यम वर्गीय श्रीमंतांचं देखील नाही. विद्यार्थ्यांचं नाही. व्यापाऱ्यांचं नाही. उद्योजकांचं नाही. खरं तर भाजपा किंवा संघामधल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं देखील हे सरकार नाही. त्यांचेही हाल काही वेगळे असणार नाहीत. निदान अडवाणी, मुरली मनोहर जोशी, संजय जोशी यांच्यासारख्या दिग्गजांची झालेली केविलवाणी अवस्था बघून तरी शहाणे व्हायला हवे. पण अजूनही ते लोक भ्रमात आहेत. भाजपमधील आमदार, खासदारांची सोडा मंत्र्यांची अवस्था सुद्धा वेठबिगारासारखी झालेली आहे. सत्तेचे रखेल असल्यासारखे वागवले जाते आहे. साऱ्यांचा मेंदू काढून घेतला आहे. शेपट्या कापून घेतल्या आहेत. गळ्यात पट्टा आहे. फेकलेली बिस्कीटं उचलायची आणि आदेश येईल त्याप्रमाणे विरोधकांच्या नावाने भुंकायचे एवढेच काम त्यांना उरलेले आहे. तरीही हे लोक निर्लज्जपणे जनतेसमोर स्वतःला नेते म्हणवून घेतात. राजे समजून ऐट दाखवतात. नुसता अतिरेक सुरू आहे. 

.. बहुधा क्रांतीचा दिवस दूर नाही ! तेव्हा.. नुसतीच वाट पाहायची की आपणही लढण्यासाठी सज्ज राहायचं, याचा निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे ! बघा. विचार करा. तूर्तास एवढेच..

संपादन : ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर अभियान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत