'या' भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
महा घडामोडी न्युज नेटवर्क नागपूर : भाजपचे नेते प्रवीण दरेकर आणि आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुन्हा एकदा मुंबै बँक घोटाळ्याचे प्रकरण समोर येत आहे. या प्रकरणाची आता खोलात जाऊन चौकशी होणार आहे. दरम्यान, बोगस दस्तावेजांच्या आधारे तब्बल 27 कोटींचे कर्ज वाटप केल्याप्रकरणी मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांच्यासह धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याच्या सहकार खात्याने दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.
ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे प्रकरण उघडकीस आल्याने यावरून राजकारण पेटण्याची शक्यता आहे. मात्र, विरोधी पक्षनेते दरेकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणातील प्रमुख आक्षेपाची बाब म्हणजे, धस यांच्या जयदत्त अॅग्रो इंडस्ट्रीज, अंभोरा आणि मच्छिंद्रनाथ ओव्हरसीज प्रा. लि., आष्टी या केवळ कागदोपत्री उद्योगांना हे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तसेच त्यासाठी बोगस दस्ताऐवज तयार करण्यात आले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते राम खाडे यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केलेल्या तक्रारीवरून हे प्रकरण समोर आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत