शेतकऱ्यांचा द्रष्टा नेता : महात्मा फुले (जन्म 11 एप्रिल 1827)
शेतकऱ्यांचा द्रष्टा नेता : महात्मा फुले (जन्म 11 एप्रिल 1827)
महात्मा जोतीराव फुलेंचे नाव समोर आले की बऱ्याचअंशी असा समज आहे की, त्यांनी शिक्षण आणि अस्पृश्यता याच क्षेत्रात काम केलेले आहे. महात्मा फुलेंनी या क्षेत्रात तर अतुलनीय कार्य केलेच आहे; परंतु या व्यतिरिक्त अनेकविध क्षेत्रात फुलेंनी कार्य केले आहे. जसे - सतीची चाल, केशवपण बंद करणे तर विधवा विवाह करणे या बरोबरच अनाथ मुलांकरिता पाळणाघरे, सत्याचा मार्ग दाखवीणारा 'सत्यशोधक समाज' या धर्माची स्थापना, लोकांना शोषणा विरुद्ध पेटून उठण्याकरिता अनेक ग्रंथाचे लेखन. एक उत्तम उद्योजक आणि सर्वोत्तकृष्ट शेतकरी म्हणून केलेलं काम आणि शेतकरी -कष्टकरी यांच्या प्रगतीकरिता केलेला संघर्ष असे अनेक कार्य त्यांच्या हातून घडले म्हणूनच त्यांचा उल्लेख 'भारतातील सामान्य जनतेच्या नवयुगाचा प्रेषित' असा उल्लेख केल्या जातो. महात्मा फुलेंनी केलेल्या कार्यापैकी एक कार्य म्हणजे महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचे केलेले पुढारीपण. शेतकऱ्यांचे एक प्रेरणादायी नेते. महात्मा फुले म्हणजे शेतकऱ्यांचा एक द्रष्टा नेता.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा शेतकरी नागवला जात आहे. त्याचे शोषण केल्या जात आहे. शेतकऱ्यांचे तारणहार म्हणून काही लोक स्वतःला शेतकरी नेते म्हणून त्यांच्या नावावर आंदोलन करून आमदार खासदार ते मंत्रीपद मिळवून स्वतःची वाहवाह करून घेत आहेत. शेतकरी सुद्धा ज्या नेत्यांचा शेतीशी संबंध नाही, शेतीचे ज्ञान नाही अशा लोकांच्या भूलथापाला बळी पडून आपले नेतृत्व अशा लोकांच्या हातात देत आहेत. आमच्या शेतकऱ्यांना आपला खरा तारणहार, आपला खरा पुढारी कोण आहे? हे त्यांना तेव्हा पर्यंत समजणार नाही, जेव्हा पर्यंत आपण त्यांच्या पर्यंत शेतकऱ्यांचा पहिला पुढारी, तारणहार महात्मा फुलेंचे कार्य आणि विचार नेत नाही तेव्हा पर्यंत हे असेच सुरु राहणार. *आणि म्हणून आजही स्वतंत्र भारतात आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरिता देशाच्या राजधानीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना राजधानीत येण्यापासून रोखल्या जाते . त्याच्यांवर गोळीबार केल्या जातो. इतकेच नव्हे तर या देशाच्या पोशींद्यालाच देशद्रोही व पाकिस्तानी ठरविल्या जात आहे... गरज आहे ज्या प्रमाणे राजर्षी शाहू महाराजांनी शेतीला राजश्रय दिला होता तसा राजश्रय देण्याची. परंतु व्यापारीच सत्तेत असणार तर शेतकऱ्यांना राजश्रय कसा मिळणार?
महात्मा जोतीराव फुले अस्सल मातीतले शेतकरी, खरा भूमिपुत्र, त्यांचे आजोबा शेटिबा आणि वडील गोविंदरावाची नाड शेतीशी आहे. जोतिराव स्वतः शेतात राबलेले, शेतकरी-कष्टकरी समाजाच्या सहवासात राहून जडण -घडण झालेले. अगदी जवळून शेतकऱ्यांच्या समस्या अनुभवलेला माणूस म्हणजे महात्मा जोतीराव फुले.
महात्मा फुलेंच्या काळात शेतकरी कष्टकरी समाजाच्या हिताच्या दृष्टीने कोणी कार्य केल्याचे दिसत नाही किंवा त्या काळातील सुधारकांनीही कधी शेती आणि शेतकऱ्यांबद्दल विचार केला असाव असं दिसत नाही. म्हणजे या देशाची एकूण परंपराच अशी की, पुस्तकी, शाब्दिक ज्ञानाची ओझे वाहणारे तेवढे श्रेष्ठ आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा ज्याच्या पाठीवर - डोक्यावर उभा असणारा शेतकरी समाज कायम उपेक्षित.. ! महात्मा फुलेंनीच सर्वप्रथम असा विचार मांडला की, 'शेतकरी हा प्रतिष्ठीत असला पाहिजे आणि शेतीही उत्तम आधुनिक पद्धतीने केली पाहिजे.'
तेव्हा आणि आज शेतकऱ्यांबाबतीत उच्चभ्रू समाजाचं एकमत :- संपूर्ण देशातील शेतकरी धोरण आणि योजना कुचकामी ठरत आहेत असं दिसत आहे. कारण शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या. आत्महत्या रोखण्याकरिता काय नियोजन करावं यापेक्षा, मागे एकदा तेव्हाच्या एका मंत्र्यांने अकलेचे तारे मोडत म्हणाले होते की, शेतकरी दारूमुळे कर्जबाजारी झालेत, मुलांच्या लग्नावर अति खर्च करतात, त्यापुढे जावून म्हणाले होते की, मोबाईल चे रिचार्ज भरायला शेतकऱ्यांकडे पैसा आहे मग बँकेचे कर्ज भरायला पैसे नाहीत का..? (बरं झालं अजून कोणी असं नाही म्हटलं की, 'मुलांच्या शिक्षणाकरिता पैसे आहेत आणि कर्ज भरायला का नाही?') आज जशी ही परिस्थिती आहे तशीच महात्मा फुलेंच्या काळात सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीत दिशाभूल करणारी परिस्थिती पुरोहित वर्गाने निर्माण केली होती. ते म्हणायचे, 'शेतकऱ्यांची परिस्थिती आता पूर्वीपेक्षा सुधारलेली आहे' किंवा 'शेतकरी लग्नकार्यात वाजवीपेक्षा अधिक खर्च करतो'. म्हणजेच काय तर सांस्कृतिक व धार्मिक दृष्टया श्रेष्ठ म्हणवून घेणाऱ्या अल्पसंख्यांकांची सत्ता आहे व ती कायम चालत रहावी म्हणून शेतकरी - कष्टकरी समाजाविषयी नेहमीच दिशाभूल केल्या जात आहे.
इंग्लंड च्या राजपूत्राकडे शेतकऱ्यांची व्यथा :- नोव्हेंबर 1875 चा काळ आहे. इंग्लंडचा राजपूत्र प्रिन्स आफ वेलस हा भारताच्या दौऱ्यावर होता. यावेळी भारतातील अनेक संस्थानिक त्यांची भेट घेऊन स्वतःच्या सोयीसवलती, पगार, पेन्शन संदर्भात चर्चा करत होते. दुसरीकडे गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे वेष धारण करून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडायला महात्मा फुलेंनी राजपूत्राची भेट घेऊन शेतकऱ्यांचे होत असलेले धार्मिक आणि आर्थिक शोषण थांबवून त्यांच्याकरिता विविध योजना आणि सवलती इंग्रज सरकारने द्यावे अशी मागणी घातली.
शेतकऱ्यांच्या असंतोषाचे जनक :- महात्मा फुलेंनी राजपूत्राची भेट घेतल्याची फलनिष्पती अशी झाली की, कर्जाच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराकडे हस्तांतरीत होत होत्या ते थांबाविण्याकरिता इंग्रज सरकारने 'डेक्कन ऍग्रीकल्चर रिलीफ एक्ट' तयार केला. या कायद्याने सावकाराचे नुकसान होईल म्हणून बाळ गंगाधर टिळकाने विरोध केला. तसेच श्रमकरी - कष्टकरी वर्गाचे शोषण करणारी कोकणातील खोत पद्धत. खोती पद्धतीचा विरोध जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला तेव्हा इंग्रज सरकारने खोतकुळ पद्धत नियंत्रित करणारा कायदा इंग्रज सरकारने करण्याचे ठरविले तेव्हा टिळकाने या कायद्यास विरोध करणारे आणि खोती पद्धतीची बाजू मांडणारे सहा लेख 'केसरी' वृत्तपत्रमधून लिहिले. शेतकऱ्यांनी समजून घ्यावे की खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या असंतोषाचे जनक कोन आहेत. तेव्हा शेतकऱ्यांनी मागणी करताच इंग्रजांनी खोती पद्धत रद्द केली. परंतु आज लोकशाही शासन व्यवस्थेत शेतकऱ्यांनी निवडून दिलेले सरकार मात्र शेतकरी विरोधी कायदे बनवून काही निवडक उद्योगपत्यांच्या जबड्यात शेतकऱ्यांना ढकलत आहे. शेतकरी विरोधी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनाच देशद्रोही ठरवून त्यांच्यावर गोळीबार केल्या जात आहे.
जुन्नर येथील शेती लढा यशस्वी :-. पूणे जिल्ह्यातील जमीन मालकांनी कुळांवर अन्यायी खंडवाढ करताच महात्मा फुलेंनी तेथील शेतकऱ्यांना संघटित करून, यापुढे जमिनदारांच्या जमिनी न कसता त्या पडिक ठेवण्याचे आव्हान करताच, जमिनदार वर्ग नमला आणि खंडवाढ मागे घेतली.
शेतकऱ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष :- शेतकरी -कष्टकरी समाजाच्या अवन्नती आणि आर्थिक शोषणाचे कारण धर्मव्यवस्था आहे आणि या धर्मव्यवस्थेने इथल्या शूद्र-अतिशूद्र (शेतकरी, कुणबी,मराठा, ओबीसी, एस.सी., एस. टी.) यांना कायम शिक्षणापासून लांब ठेवले आहे. 'शेतकऱ्यांचा विकास कशाने साध्य होऊ शकतो तर ते शिक्षणाने', असे सांगणारे पहिले क्रांतिकारक म्हणजे महात्मा फुले. महात्मा फुले इंग्रजांना बजावतात की, "शेतकऱ्यांच्या मुलांना विद्या देण्याच्या नावावर शेतकऱ्यांकडून 'लोकल फंडात' जो कर जमा केल्या जातो तो पुरोहितवर्गाच्या मुलांच्या उच्च शिक्षणावर खर्च न करता, तो शेतकरी कष्टकरी समाजाच्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करून शेतकऱ्यांचे शोषण थांबवायला ते सांगतात." आज सुद्धा धर्माला समोर करून, शेतकऱ्यांच्या धार्मिक अज्ञानाचा फायदा घेऊन मंदिराच्या नावावर शेतकरी व बहूजन समाजाकडून पैसा वसूल केल्या जातो. जमा झालेल्या पैशाचा कोणताही हिशोब न देता उच्चवर्णिय व पुरोहितांच्या कल्याणाकरिता केल्या जातो. परंतु कोणाचीही काहीही हाक ना बोंब. या धार्मिक शोषणाविरुद्ध बंड करण्याकरिताही आम्हाला महात्मा फुलेंचे स्मरण करावे लागते.
शेतकऱ्यांचा असुड :- शेतकऱ्यांनी ज्या ग्रंथाचे पारायण करायला पाहिजे होते, ज्याला शेतकऱ्यांचा ग्रंथ म्हणून मान्यता मिळायला पाहिजे होती तो महात्मा फुले लिखित ग्रंथ म्हणजे शेतकऱ्यांचा असूड. मध्यम व कनिष्ठ प्रतीच्या शेतकऱ्यांची हलाखी व दुःख प्रकट करणारा ग्रंथ म्हणजे शेतकऱ्यांचा असूड. शेतकरी हा प्रतिष्ठित असला पाहिजे आणि शेती उत्तम केली पाहिजे या दृष्टीने प्रथम विचार या ग्रंथाच्या माध्यमातून फुलेंनी केला आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतानी फुलेंनी सामाजिक लढा हा केवळ जातीनिर्मूलन पातळीवर मर्यादित न ठेवता तो आर्थिक पातळीवर नेऊन ठेवला. शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणाचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे धर्म. पंतोजीनी धार्मिक व्यवस्था अशी निर्माण केलेली आहे की, शेतकऱ्यांनी शेतीपेक्षा वर्षभर सण, त्योहार, व्रत-वैकल्य, जत्रा यात्रा मध्ये गुंतून रहावे, त्यावर पैसा खर्च करावा आणि हे सर्व करण्याकरिता आमची मदत घ्यावी असा धार्मिक दंडक घालून धर्माच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण केल्या गेले आणि आजही सूरूच आहे. हे करण्यामागचे कारण म्हणजे शेती करणारा संपूर्ण वर्ग हा शूद्र अतिशूद्र आहे. आज सुद्धा शेतकरी वर्गात काही वेगळे दिसत नाही. शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोर धर्माच्या नावावर आपले शोषण करून घेण्यात स्वतःच तत्पर आहेत. बदलत्या काळात धार्मिक शोषणा बरोबरच सावकाराचा नवा वर्ग उदयास आला. या युतीने तर शोषणाविरुद्ध दाद मागण्याकरिता जागाच ठेवली नाही. या ग्रंथातिल शेतकरी सांगतो, "सावकाराच्या आईचा भाऊ रेव्हन्यू साहेबाचा दप्तरदार, चुलता कलेक्टर साहेबांचा चिटणीस, थोरल्या बहिणीचा नवरा मुनसफ, आणि बायकोचा बाप तालुक्याचा फौजदार, म्हणजेच काय तर सर्व कचेरीत एकाच जातवाले कामगार." आज सुद्धा वेगळे काय आहे. सर्व मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागेवर शेतकरी वर्गातिल लोक दिसत नाही, त्यामुळेच सरकारी पातळीवर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतल्या जात नाही. आर्थिक शोषणातून शेतकऱ्यांचे कायमची मुक्तता होईल असे नियोजन केल्या जात नाही. म्हणून फुले-शाहू -आंबेडकर सांगतात की बहुजनांच्या मुलांनी मोक्याच्या जागा काबीज करावे.
उपाययोजना :- शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कसी सुधारणा होईल या संदर्भात स्वतः महात्मा फुलेंनी उपाययोजना सांगितलेली आहे.
1. शेतकऱ्यांच्या मुलांना आधुनिक तांत्रिक ज्ञान द्यावे.
2. शेतकऱ्यांच्या शिक्षणाकरिता वेगळ्या योजना आखाव्यात.
3.शेतकऱ्यांच्या मुलांची सरकारी नौकरीतिल संख्या वाढवावी आणि ती वाढेपर्यंत पुरोहित वर्गाला त्यांच्या संख्येच्या प्रमाणातच संधी द्यावी. पुरोहितांना अधिक जागा देवू नये.
4. शेतकऱ्यांकरिता इंग्रज सरकार ज्या योजना आखेल त्या योजनेत पुरोहितवर्गाला लुडबुड करू देऊ नका. 5.शेतकऱ्यांच्या विकासाकरिता अर्थ असणे आवश्यक आहे; त्याकरिता पगारदार वर्गाचे पगार आणि पेन्शन कमी करून त्यातून अर्थ उपलब्ध करावे.
6.शेतकऱ्यांच्या जनावरांना चरण्याकरिता जंगल मोकळे करावे.
7.शेतीस आवश्यक असलेल्या पशुधनाच्या रक्षणा साठी गो-वधबंदीची मागणी ते करतात.
8. जमिनीची धूप होवू नये म्हणून शेत ताली बांधून दऱ्याखोऱ्यातिल पाणी अडवीण्याची सूचना करतात. 9.शेतातून काही चोरी झाल्यास पोलिसांना दंड करावा. 10.शेती संबंधित वार्षिक कृषी प्रदर्शन भरविण्याची मागणी करतात...
शेती सुधारण्यासाठी आणि शेतकऱ्याच्या प्रगतीकरिता अशा अनेकविध उपाययोजना महात्मा फुलेंनी तत्कालीन इंग्रज सरकारला सुचवितात. यापैकी काही योजना सरकार राबवित आहे परंतु गरज आहे महात्मा फुलेंनी सांगितलेल्या योजना अंमलात आणून त्यांना महात्मा फुलेंच्या विचारांची जोड देवून प्रभावीपणे राबविण्याची. शेतकऱ्यांच्या दुःखा ला वाचा फोडणारा पहिला महामानव म्हणजे महात्मा गोविंदराव फुले आणि म्हणूनच ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे द्रष्ट नेते ठरतात.
संपादन : दिनेश वासनिक



कोणत्याही टिप्पण्या नाहीत