लग्नात गेलेल्या कुटुंबावर हल्ला करून ९२ हजारांनी लुटले
लग्नात गेलेल्या कुटुंबावर हल्ला करून ९२ हजारांनी लुटले
सहा आरोपींपैकी एक आरोपी वाडी पोलिसांच्या जाळ्यात
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, नागपूर : हिंगणा विधानसभा क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वाडी अमरावती मार्ग आठवा मैल पावरहाऊस जवळ रात्री १० : ३० च्या सुमारास हॉटेलमधून चारचाकी वाहनातून जेवण करून परत जात असलेल्या एका कुटुंबाला अडवून आरोपींनी त्यांच्या जवळून ९२ हजाराची रक्कम लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात वाडी पोलिसांना यश आले.
वाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नुरान नजीर खान ( ३७, बिनाकी ले-आउट, वैशाली नगर, पाचपावली) हे कुटुंबासह अमरावती रोडवरील राजकमल हॉटेलात जेवण करण्याकरीता स्कॉर्पिओ या चारचाकी वाहनाने (एमएच ०२डीडब्यू०३३०) गेले होते. जेवण करून नागपूरला परत येत असताना दोन दुचाकींवर आलेल्या सहा अनोळखी युवकांनी त्यांचा पाठलाग केला.
पावर हाऊसजवळ दुचाकी वाहन चारचाकीसमोर आणून उभे केले व चारचाकीतील सदस्यांना शिविगाळ करून दगडाने काचा फोडल्या. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर आरोपींनी नुरान नजीर खान, कलाम शेख चांद शेख (५८), रमेश खान मजर जमील खान (२६) यांना दगडाने व हातबुक्क्यांनी जबर मारहाण करून जखमी केले. यासह फिर्यादीच्या नातलगाच्या खिशातील ११ हजार रुपयांची रोख व सासऱ्यांचा मोबाईल, फिर्यादीच्या सासूच्या गळ्यातील २ तोळ्याची सोन्याची चैन, लेडीजपर्समधील ६ हजारांची रोख असे मिळून ९२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
दरम्यान पोलिसांचे वाहन पेट्रोलिंग करीत असताना तिथे पोहोचले. त्यांनी उपस्थित महिलांना याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सर्व हकीकत सांगितली. लगेच पोलिसांनी आरोपींच्या पाठलाग केला व यापैकी एक आरोपी पकडण्यात त्यांना यश आले. आरोपीला पोलिस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सगळी हकीकत उगलली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत