Breaking News

वाघडोहची चाल ऐटबाज, मुद्रा करारी !, ताडोब्यात चाहत्यांकडून श्रद्धांजली अर्पण

 वाघडोहची चाल ऐटबाज, मुद्रा करारी !, ताडोब्यात चाहत्यांकडून श्रद्धांजली अर्पण

आईच्या हृदयाचा 'लीजंड' बाप गेला !; 

१७ वर्षीय वाघडोहने घेतला शोवटचा श्वास


महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर ; चाल ऐटबाज, मुद्रा करारी, रुबाबदारणा मोहून टाकणारा आणि भारदस्त देहयष्टी. असा होता, 'वाघडोह'. त्याचा मृत्यू अनेकांचा चटका लावून गेला. तो दिसणे हे पर्यटकांसाठी अतिशय आनंददायी असायचे. मायाळूपणामुळे हे त्याचे वैशिष्ट्य होते. एरवी वाघांची चाळीस टक्के मृत्युमुखी पडतात. वाघडोहपासून झालेली सुमारे ८० टक्के पिल्ले जगली. या पिल्लांनी ताडोब्याचे वैभव वाढविले. वनविभागात त्याची 'टी-३३' अशी नोंद होती.


वाघडोहचा मोहर्ली, खातोडा व तैलिया तलावानजीक भू-भागांवर एकछत्री अंमल होता. येथे त्याने येडाअण्णा वाघाला हुसकावून लावले होते. रानगव्याची शिकार करताना त्याच्या डोळ्याला जखम झाली होती. त्याच्या चेहऱ्यावरील जखमेची खूण शेवटपर्यंत कायमच होती. तो 'बिग डॅडी ऑफ ताडोबा'म्हणूनही ओळखला जात असे. सुमारे पंचेचाळीसहून अधिक पिल्लांचा तो वडील होता. त्याची पिल्लांसोबत खेळतानाची छायाचित्रे टिपणे एक वेगळाच आनंद असायचा, असे छायाचित्रकार निखिल तांबेकर म्हणाले.


भारदस्त शरीर ही त्याची ओळख होती. प्रतिस्पर्ध्यांमध्ये त्याची दहशतही यामुळेच प्रस्थापित झाली होती. तो फारसा झुंजत नसे. ताडोबा कोअरमधून मोहर्ली, आगरझरी, देवाडा मामला, जुनोना असा प्रवास त्याने केला. वाघ म्हातारा होता जातो तसतसा तो गाव-जंगलाच्या सीमेवर येतो. तो सिनाळा भागात स्थिरावला होता. मागील काही दिवसांपासून वृद्ध झाल्याने त्याची शक्ती क्षीण होऊ लागली. शिकार करणेही त्याला कठीण होऊ लागले होऊ लागले. यातच त्याचा त्याचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच वन्यप्रेमींनी वाघडोहला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी अनेकांनी आठवणी जाग्या केल्या.


आईच्या हृदयाचा 'लीजंड' बाप गेला

बछडे जगतात काय की मरणाच्या तोंडात जातात काय, याची नर वाघाला फारशी काळजी नसते. ही सर्व जबादारी असते वाघिणीची. वाघिणीचा जीव पिल्लांत सतत गुंतलेला असतो. त्यांच्या सुरक्षेची ती मोठी होईपर्यंत काळजी वाहत असते. वाघ मात्र याबाबत बेफिकीर असतो. वाघडोह तसा नव्हता. हा बाप आईच्या हृदयाचा होता. पिलांची तो कसोशीने काळजी घ्यायचा. हे वाघांच्या स्वभावाविरुद्ध होते. पण वाघडोह अपवाद होता. कुटुंबवत्सल होता. आठवणींचा असा उजाळा दाटून येत होता. वाघडोहला अखेरचा निरोप देताना डोळे पाणावलेलेही होते.


ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सर्वात मोठा; किंबहुना देशातील सर्वात मोठा वाघ मानल्या जाणारा वाघडोह हा वाघ सोमवारी सिनाळा भागात मृतावस्थेत आढळला. वृद्धापकाळामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक निदान आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याला शिकार करणे कठीण झाले होते. ताडोब्याच्या अधिकाऱ्यांचे त्याच्यावर लक्ष होते. चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये या वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. नमुने पुढील तपासणीसाठी नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.


हा वाघ २०१०मध्ये ताडोबा परिसरात दिसला. त्यावेळी तो सुमारे साडेचार वर्षांचा होता. आला तेव्हापासून त्याने वर्चस्व प्रस्थापित केले. प्रसिद्ध वाघीण माधुरी ही त्याची पहिली जोडीदार होती. त्यांच्या बछड्यांनीही ताडोब्याच्या जंगलावर अधिराज्य गाजविले. पिल्लांची आई शिकारीसाठी गेली की वाघडोह पिलांची काळजी घ्यायचा. त्याच्यामुळे त्याची पिल्ले खूप जगली. ताडोब्याला प्रसिद्धी मिळवून देण्यात, ताडोब्याच्या विकासात या वाघाचा सिंहाचा वाटा होता.


...म्हणून तो 'वाघडोह'

वाघडोह हा ताडोब्याच्या जंगलातील प्रसिद्ध पाणवठा आहे. याच पाणवठ्यावर हा वाघ पहिल्यांदा दिसला. तेव्हापासून ते 'वाघडोह' नावानेच ओळखला जाऊ लागला. वन्यप्रेमी आणि अभ्यासकांमध्ये तो 'स्कारफेस' म्हणून ओळखला जात होता. तो आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर खुणा होत्या. ओठ फाटलेले होते. एक डोळा अर्धवट उघडलेला होता. युद्धातून जखमी पण विजयी वीर आल्याचा तो भाव होता. सुरुवातीचे काही महिने अतिशय बुजरा असायचा. जिप्सी आल्या की जंगलात पळायचा, पण नंतर मात्र निर्धास्त झाला. तो आक्रमक नव्हता. त्याच्यासारखा कुटुंबवत्सल वाघ आजपर्यंत पाहिला नाही, अशी माहिती प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक अतुल धामनकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.


सिनाळा जंगलात राज्यातील सर्वात वयोवृद्ध वाघाचा नैसर्गिक मृत्यू झालाय. तो १७ वर्षांचा होता. एवढ्या वयाचा राज्यातील हा एकमेव वाघ असल्याचे सांगितले जाते. हा वाघ 'वाघडोह' नावाने प्रसिद्ध होता. वाघडोह हा वाघ प्रचंड धिप्पाड होता. प्रारंभीचा काळ ताडोबा व्याघ्र प्रकल्पात घालवल्यानंतर युवा वाघांनी त्याला वृद्धापकाळात बाहेर हुसकावले. तेव्हापासून तो ताडोबाच्या बफर क्षेत्रालगत असलेल्या जंगलात भटकत होता. वय वाढल्याने शिकार करण्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे गावाशेजारी वास्तव्य करून सहज मिळणारी शिकार करून तो जगत होता.


२१ मे रोजी सिनाळा येथे एका गुरख्याचा मृत्यू झाला होता. तो याच वाघाने केल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी त्याचा जर्जर अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हाच त्याच्या जगण्यावर प्रश्न निर्माण झाला होता. आज सिनाळा जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याचे सर्व अवयव शाबूत असून, एक दीर्घकाळ जगलेला वाघ मृत्युमुखी पडल्याने वन्यजीवप्रेमी व्यथित झाले आहेत.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत