विचोडा गावातील सांडपाण्याची समस्या तातडीने सोडवा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
विचोडा गावातील सांडपाण्याची समस्या तातडीने सोडवा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : विचोडा ग्रामपंचायत मधील वॉर्ड नंबर १ मध्ये नाल्या तुडूंब भरुन पाणी रस्त्यावर वाहत असल्याने मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या ग्राम पंचायतीने तातडीने सोडवावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सौ उज्वला नलगे यांनी दिला आहे.
चंद्रपूर तालुक्यातील विचोडा ग्रामपंचायत मधील वॉर्ड नंबर १ मध्ये नाल्या फार निकृष्ट दर्जाच्या बनविण्यात आल्या आहे. त्यातही माती साचली असल्याने सांडपाणी नाल्यांच्या बाहेर रस्त्यावर वाहत आहे. याबाबत गावकऱ्यांनी वारंवार ग्राम पंचायतीकडे निवेदने दिली असून सरपंच, उपसरपंच व इतर सदस्य याकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत गावकऱ्यांनी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटीका सौ. उज्वला प्रमोद नलगे यांच्या कार्यालयात जाऊन आपल्या समस्या सांगितल्या. सौ. नलगे यांनी लगेच विचोडा गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. तेथील महिला व गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. येथील सरपंच यांना फोन करून बोलाविले. पण त्या भीतीपोटी आल्याच नाही.
येथील नाल्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या बांधण्यात आल्या आहे. यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. नाल्यांमध्ये माती साचल्याने सांडपाणी नाल्यांनी न जाता रस्त्याने वाहत आहे. गेल्या ८ महिन्यांपासून नाल्यांची साफसफाई ग्रामपंचायत कडून करण्यात आली नाही. हे सांडपाणी काही शेतकऱ्यांच्या शेतात सुद्धा जात असल्याने यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
अनेक आजारांची भीती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीस रुग्णालयात भरती करण्यात आले. येत्या काही दिवसांत पावसाळा सुरू होईल त्यामुळे ही समस्या आणखी वाढेल आणि गावात रोगराई पसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे ग्रामपंचायतीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही गंभीर समस्या तातडीने सोडवावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका सौ उज्वला प्रमोद नलगे यांनी दिला आहे.
यावेळी सद्दाम कनोजे, ज्ञानेश्वर लोनगाडगे, सुश्मित गौरकार, रोहन नलगे, चेतन कामडी, आतिश चीमुरकर, एकनाथ देवतळे, रोनित नलगे, तुषार लोनगाडगे, शुभम घागरगुंडे, केतन शेरकी, कपिल शेरकी आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत