Breaking News

भूखंडाच्या आंदोलनास राजकीय वास

 भूखंडाच्या आंदोलनास राजकीय वास

देवस्थान जमिनीवर बंगले, हॉटेल बांधणारे आंदोलनात डॉ. बाळासाहेब कावरे यांची टिका

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी दत्ता ठुबे, पारनेर : देवस्थानच्या जमिनीवर बंगले, हॉटेल बांधणारे, शासकीय जागेवर इमारत बांधून दुकाणे सुरू करणारे, तहसिल, बसस्थानक परिसरात टपऱ्या टाकणारे नीलेश लंके प्रतिष्ठाणला अत्याधुनिक धर्मदाय रूग्णालय उभारणीसाठी देण्यात येणाऱ्या भूखंडासाठी विरोध करीत आहेत. या आंदोलनास राजकीय वास येत असून स्वतःला काही उभे करता आले नाही म्हणून इतरांच्या उपक्रमांना विरोध केला जातो आहे. गोरगरिबांना सर्व प्रकारचे मोफत उपचार मिळणार असतानाही केवळ राजकीय सुड भावनेतून हे सर्व सुरू आहे. अर्थात पारनेरकर हे सर्व जाणून आहेत. त्यांचा या रूग्णालयास पाठींबा आहे. चार दोन विरोधकांनी कितीही कोल्हेकुई केली तरी हे रूग्णालय उभे राहणारच असा विश्‍वास राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे यांनी सांगितले.

       भूखंडाला विरोध करणारी हीच टोळी माजी आमदारांचे घर अतिक्रमणात आहे असा गाजावाजा करीत होती. आता परत त्यांच्याच पायापुढे लोटांगण घेत आहे. हे खाटीकाने पशुहत्या करू नये असे प्रवचन देण्यासारखे झाल्याचे खरमरीत टीका करून डॉ. कावरे म्हणतात, पारनेर शहर बंदची हाक देणाऱ्या टोळीला गावाचं काहीच घेणं देणं नाही. त्यांना फक्त चांगल्या कामात आडवं येऊन ब्लॅकमेल करणे एवढेच माहीती आहे. गट नंबर ९६ मध्ये व्यापारी संकुल उभारा, घरकुल उभारा, कोर्ट इमारत बांधा हे आता सांगत आहेत. तेच पूर्वी गावाबाहेर कोर्ट न्यायचे का ? गावची बाजारपेठ बाहेर नेऊन गाव ओस पाडणार का यासाठी आंदोलन करीत होते याची आठवण करून देतानाच आता गावाबाहेर सगळं जावं म्हणून आंदोलन करीत आहे. यांच्या भूमिका प्रत्येक वेळी बदलतात. केवळ विरोध करायचा एवढाच उद्योग असल्याचे कावरे यांनी सांगितले.

         गट नंबर ९६ मधील जमिन शासनाची आहे. नगरपंचायतीचा व या जमीनीचा काडीमात्र संबंध नाही. नगरपंचायतीस केवळ ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आहे. असे असतानाही सर्व काही नगरपंचायतीच्याच हातात आहे असे भासवून नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे. नगरपंचायतकडे रूग्णालयाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव देण्यात आला होता. तो नगरपंचातीने बहुमताने मंजुर केला. त्यात वावगे असे काय झाले ? प्रतिष्ठाणला जमिन देऊ नये अशी मागणी करून विकृतीचे दर्शन घडविले जात आहे. त्या जमिनीवर सेवाभावी दवाखाना उभा राहणार आहे. तेथे बिलेच आकारण्यात येणार नाहीत. सर्दी, खोकल्यापासून कॅन्सर, बायपास, डायलिसिस पर्यंच्या सर्व आजारांवर मोफत उपचार होणार आहेत. पारनेर शहर, तालुका, जिल्हा अगदी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील रूग्णांवर तेथे मोफत उपचार होणार आहेत, त्याला तुमचा विरोध का असा सवाल डॉ. कावरे यांनी केला आहे.

        गोरगरिबांना सर्व उपचार मोफत मिळणार आहेत. त्यांना मुंबई, पुण येथे उपचारास जाण्याची गरज भासणार नाही, उलट मुंबई, पुण्याचे रूग्ण येथे उपचाराला येतील त्याला विरोध केला जातोय. गोरगरीबांचा पैसा वाचणार म्हणून आंदोलकांचा विरोध आहे का ? उपचारच सोडा, उपचारानंतर गरज असेल तर त्या रूग्णास घरी पोहचविण्याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. साई संस्थानच्या रूग्णालयात देशभरातून लाखो रूग्ण येऊन उपचार घेतात. त्याच धर्तीवर हे रूग्णालय उभे राहणार असल्याचे कावरे यांनी सांगितले.

       रूग्णालयाच्या माध्यमातून हजारो लोकांची पारनेमध्ये वर्दळ वाढेल, त्यामुळे व्यवसाय वाढतील, शेकडो, हजारो मुलांना तेथे रोजगार मिळेल, हजारो कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न मार्गी लागेल. भविष्यात रूग्णालयाच्या माध्यमातून शासकिय वैद्यकिय महाविद्यालय तसेच आरोग्याशी संबंधित सलग्न महाविद्यालये तिथे उभी राहतील. त्यातून शहराची आर्थिक सुबत्ता वाढेल. हजारो मुलांना तेथे प्रवेश मिळेल, रोजगार निर्मिती होईल.

कोरोना काळात नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या कोव्हीड सेंटरमुळे हजारो रूग्णांचे जीव वाचले. तेथे सर्वांना मोफत उपचार दिले गेले. प्रतिष्ठाणचे सेंटर नसते तर शेकडो लोकांचे प्राण गेले असते. त्या काळात तुम्ही कुठे गेला होता असा सवाल कावरे यांनी केला. सध्या सुरू असलेल्या पंढरीच्या वारीमध्ये गेल्या दहा दिवसांपासून लाखो रूपयांची औषधे वारकऱ्यांना मोफत वितरीत करण्यात आली. बंदची हाक देणारांचे समाजासाठी योगदान काय ?

 सुटीच्या दिवशी बंदची हाक !

शनिवारी बहुतेक व्यापारी सुट्टी घेतात. सुटीच्या दिवशी गाव बंदची हाक देऊन विरोधकांनी काय साधले असा सवाल कावरे यांनी केला आहे. शासनाची जागा धर्मदाय संस्थेस सामाजिक कामासाठी कराराने दिली जाते. त्यावर मालकी हक्क कोणाचाही नसतो. तो शासनाचाच असतो. त्यामुळे नागरिकांची दिशाभूल करून गलिच्छ राजकारण करण्यात येत आहे. पारनेर शहराचा नागरीक म्हणून माझी शहरवासीयांना विनंती आहे की विकृत मनोवृत्तीच्या इतिहास तपासावा व त्यांच्या विचारांना भिक घालू नये असे आवाहन डॉ. कावरे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत