शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट
शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट
दिवाळी पॅकेज केवळ १०० रुपयात देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
लोकहितकारी शासनाच्या लोकहितकारी निर्णयाबद्दल अभिनंदन – देवराव भोंगळे
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,नागपूर : दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना केवळ १०० रुपयांत शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज देण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना रवा, चणाडाळ, साखर प्रत्येकी एक किलो आणि एक लिटर पामतेल यांचा समावेश असेल. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे सात कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ४८६ कोटी ९४ लाख खर्चासदेखील मान्यता देण्यात आली.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या इतरही निर्णयांची माहिती दिली. पोलिसांसाठी देण्यात येणारी हाऊसिंग लोन योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे राज्यातील पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय भंडारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनेला मान्यता देण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यासाठी कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प सुधारणेला मान्यता दिली आहे. याचा मराठवाड्यातील ८ दुष्काळी तालुक्यांना फायदा होणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.
या पॅकेजमध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रती १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे ७ कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे, ही अतिशय महत्वाची बाब आहे. लोकहितकारी राज्य शासनाने घेतलेला हा लोकहितकारी निर्णय अतिशय महत्वाचा आहे, असेही देवराव भोंगळे यांनी म्हटले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत