खेडेगावातून चार्टर्ड अकाउंटंटपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास – हर्षल गमे यांचे यश सर्वांसाठी आदर्श
खेडेगावातून चार्टर्ड अकाउंटंटपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास – हर्षल गमे यांचे यश सर्वांसाठी आदर्श
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, कुही : “इच्छा असेल तर मार्ग निघतो” हे वाक्य खरे करून दाखवले आहे कुही तालुक्यातील नवरगाव या छोट्याशा गावातील युवक हर्षल गीता संजय गमे याने. नुकत्याच जाहीर झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षेत यश संपादन करून त्याने आपल्या शेतकरी पालकांचे, शिक्षकांचे आणि संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
शेतातील श्रमांतून शिक्षणाची वाटचाल:
हर्षलचा जन्म नवरगाव या छोट्या खेडेगावात झाला असून तो सध्या देखील आपल्या मूळ गावी वास्तव्यास आहे. वडील गीता संजय गमे आणि आई या दोघांनीही शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. या प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची कास सोडली नाही आणि यशाच्या दिशेने सातत्याने वाटचाल केली.
शालेय शिक्षणाची पायाभरणी गावातच:
हर्षलचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, नवरगाव केंद्र-डोंगरगाव येथे सातवीपर्यंत झाले. त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण प्रियदर्शनी हायस्कूल, डोंगरगाव येथे पूर्ण केले. इथेच त्याच्या अभ्यासू वृत्तीला आणि स्वप्नांना दिशा मिळाली.
उच्च शिक्षणासाठी नागपूरकडे वाटचाल:
दहावी नंतर हर्षलने नागपूरला स्थलांतर करून सक्करदरा चौकातील विदर्भ बुनियादी जूनियर कॉलेजमध्ये अकरावी-बारावीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे हिस्लॉप कॉलेज, नागपूर येथे वाणिज्य शाखेतील पदवी घेतली. परिश्रम आणि ध्येयाने प्रेरित होऊन सन 2025 मध्ये सीए अंतिम परीक्षा दिली आणि यशस्वीपणे उत्तीर्ण झाला.
गावकऱ्यांचा गौरव व अभिनंदनाचा वर्षाव:
हर्षलच्या या यशाबद्दल संपूर्ण नवरगाव आणि परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डोडमा ग्रामपंचायतचे सरपंच वामनराव घोडमारे, पोलीस पाटील प्रशांत गमे, माजी मुख्याध्यापक भगवान वैद्य, वर्गशिक्षिका मंगला नरडे, शोभा नागपूरकर, रामकृष्ण कावळे, तसेच शाळेतील सध्याच्या मुख्याध्यापिका प्रतिभा कनिरे, शिक्षक प्रशांत भागवत, तुळशीराम हुंगे, वंदना तिजारे, केंद्रप्रमुख महेंद्र पारसे, गावातील आजी-माजी विद्यार्थी, मित्रमंडळी, नातेवाईक आणि ग्रामस्थ यांचे मन:पूर्वक अभिनंदन हर्षलवर होत आहे.
विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरणारे यश:
शहरी सुविधांचा अभाव, आर्थिक अडचणी आणि शेतमजूरी यांच्यातून शिक्षणात सातत्य ठेवणे हे खरोखरच खडतर कार्य आहे. मात्र हर्षल गमे याने दाखवून दिले की, स्वप्न मोठी असावीत आणि त्यासाठी परिश्रम अपार असावेत. आजचे हे यश त्याच्या जिद्दीची आणि चिकाटीची पावती आहे. त्याचा प्रवास अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत