Breaking News

अतिवृष्टीमुळे अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर महापालिकेची सुरक्षा यंत्रणा सक्रिय

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, नागपूर : नागपूर शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबाझरी, फुटाळा आणि गोरेवाडा या तिन्ही प्रमुख तलावांची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. यामुळे तलाव ओव्हरफ्लो होण्याची शक्यता लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभाग आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने संयुक्तरित्या खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत.

सदर तीनही तलावांच्या परिसरात सुरक्षेसाठी कठडे बसवण्यात आले असून, नागरिकांना धोक्याची जाणीव व्हावी यासाठी सावधानतेचे सूचना फलक लावण्यात आले आहेत. तलावाच्या काठावर येणाऱ्या नागरिकांनी या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, मुख्य अग्निशमन अधिकारी तुषार बाराहाते यांच्या मार्गदर्शनात हे सर्व सुरक्षात्मक उपाय तातडीने राबवण्यात आले आहेत.

महापालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणीही तलावांच्या काठावर किंवा जलस्तर वाढलेल्या ठिकाणी अनावश्यकपणे जाऊ नये. कोणतीही आपत्तीजनक स्थिती उद्भवू नये, यासाठी प्रशासन सज्ज असून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत