शासनाचे डोळे झाक – रेती माफियांच्या तालावर प्रशासनाची नाचगाणी?
अवैध रेती उत्खनन व जड वाहतुकीवर तातडीने आळा घाला!
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील वर्धा नदी परिसर आज रेती माफियांच्या मनमानी मुळे अक्षरशः उद्ध्वस्त होताना दिसत आहे. धानोरा, आर्वी, विरूर स्टेशनसह परिसरात दिवसाढवळ्या क्रेन, शेकडो ट्रॅक्टर, टिपर व डंपरच्या साहाय्याने सुरू असलेले अवैध रेती उत्खनन आणि तस्करी प्रशासनाच्या डोळ्यासमोर चालू असून, शासनाला कोट्यवधींचा महसुली फटका बसत आहे.
माफियांना राजकीय छत्रछाया?
स्थानिकांचे आरोप स्पष्ट आहेत – काही लोकप्रतिनिधींच्या छुप्या आशीर्वादामुळेच हा माफिया इतका निर्भय झाला आहे. नियम, अटी-शर्ती, परवाना प्रक्रिया यांची सरळ पायमल्ली करून, नदीपात्र पोखरले जात आहे आणि नैसर्गिक संसाधनांचा उघडपणे ऱ्हास होत आहे.
तक्रारी व्यर्थ – प्रशासनाचे मौन धारण
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाईचा अभाव धक्कादायक आहे. उलटपक्षी, माफियांना मोकळे रस्ते उपलब्ध होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
रात्रीच्या अंधारात होणारी अवैध वाहतूक रस्त्यांची अक्षरशः चाळण करत आहे. भेंडाळा – विरूर स्टेशन – अमृतगुडा मार्गावर प्रचंड खड्ड्यांमुळे खासगी व शासकीय वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, नागरिकांच्या हालअपेष्टा प्रचंड वाढल्या आहेत.
पर्यावरणीय नियमांचा बेजबाबदार भंग
पुरातत्त्व व पर्यावरणीय कायद्यांनुसार ३०० मीटर परिसरात उत्खनन निषिद्ध असताना, रेती माफिया बिनधास्तपणे पूल, पक्के रस्ते आणि निसर्गाची तुडवणूक करीत आहेत. पर्यावरणाचा होणारा हा उघड उघड नाश थांबविण्याऐवजी प्रशासन सोयीस्कर मौन धारण करत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांनी केला आहे.
काँग्रेसचा इशारा – तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन
या पार्श्वभूमीवर तालुका काँग्रेस कमिटी राजुरा यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन तातडीने अवैध रेती उत्खनन व वाहतूक थांबविण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
शासनाचे लक्ष वेधणारा प्रश्न
- शासन व प्रशासनाने आता तरी जागे होऊन रेती माफियांवर कडक कारवाई करावी का?
- की महसुली नुकसान, पर्यावरणाचा नाश आणि नागरिकांचे जीव धोक्यात घालून दुर्लक्षाचे राजकारण सुरूच ठेवायचे आहे?



कोणत्याही टिप्पण्या नाहीत