अवैध दारू विक्रेते जोमात, पोलीस ठाणेदार मात्र कोमात!
जिवती तालुक्यात अवैधरित्या बोगस दारूचा पुरवठा; नागरिकांत तीव्र नाराजी
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटचा सीमेवरील तालुका म्हणून ओळखला जाणारा जिवती तालुका हा सध्या अवैध दारू विक्रीमुळे चर्चेत आला आहे. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेजवळील या भागात तेलंगणा राज्यातून बोगस व डुप्लिकेट दारू मोठ्या प्रमाणावर चारचाकी वाहनांमधून आणली जात असून, ती जिवती तालुक्यात खुलेआम विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाते.
यामध्ये विशेष म्हणजे पिट्टीगुडा पोलीस स्टेशन हद्दीतच हा दारू माफिया सक्रीय असल्याची चर्चा असून संबंधित ठाणेदारासोबत त्यांचे चांगले संबंध असल्याच्या चर्चा गावागावांत रंगल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सणासुदीच्या काळात वाढलेली दारू विक्री
नुकत्याच पार पडलेल्या बैलपोळा सणाच्या दिवशी मरकागोंदी, नंदप्पा, माथाडी परिसरात बोगस डुप्लिकेट तसेच देशी-विदेशी दारू मोठ्या प्रमाणात विकली गेली. या दारूचे भाव मात्र प्रचंड फुगवून ग्राहकांची लूट झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. या अवैध धंद्यात स्थानिक काही लोकप्रतिनिधी आणि पोलीस अधिकाऱ्यांचा संगनमत असल्याची कुजबुज सुरू आहे.
नागरिकांचे संसार उद्ध्वस्त, तरुण पिढी आहारी
अवैध दारूमुळे गावागावात पती-पत्नीतील भांडणं, कौटुंबिक वाद, तरुणाईची दारूच्या आहारी जाण्याची समस्या वाढली आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होत असून, आई-वडिलांना आपल्या मुलांच्या भवितव्याची काळजी वाटत आहे. या पार्श्वभूमीवर एका लोकप्रतिनिधींनी “दारू विक्रीमुळे गावातील शांतता भंग पावते, अनेकांचे संसार उध्वस्त होतात. त्यामुळे अवैध दारू विक्री तातडीने बंद करावी,” अशी ठाम मागणी केली.
परंतु संबंधित ठाणेदाराचे उत्तर मात्र संतापजनक होते. त्यांनी नागरिकांनाच सांगितले की, “दारू पकडून द्या, मग मी कारवाई करतो.” यावरून ठाणेदार प्रत्यक्ष कारवाई करण्याच्या भूमिकेत नसून, सर्व जबाबदारी गावकऱ्यांवर ढकलत असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांवर पैशांच्या डीलची चर्चा
चर्चित चर्चेनुसार, मागील दहा ते पंधरा दिवसांत किमान दोन चारचाकी वाहने दारूसह पकडण्यात आली होती. मात्र काही पोलीस कर्मचाऱ्यांनी मोबाईलवरून संपर्क साधून ‘डील’ करून ती वाहने सोडल्याची माहिती बाहेर आली. नेमकी किती पैशांची देवाणघेवाण झाली हे मात्र अद्याप गुप्त ठेवण्यात आले आहे.
नागरिकांची मागणी – अवैध दारू विक्री तात्काळ बंद करा
पिट्टीगुडा ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू माफियांचे नेटवर्क दिवसेंदिवस मजबूत होत चालले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे लक्ष घालून तातडीने या अवैध दारू विक्रीला आळा घालावा, अशी मागणी केली आहे.
नागरिकांचे लक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे
जिवती तालुक्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष वरिष्ठ पोलिस अधिकारी याकडे लक्ष देऊन खरोखरच अवैध दारू विक्री बंद करतात का, की फक्त चर्चाच सुरू राहतात, याकडे लागले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत