Breaking News

जिवती पोलिस ठाण्याच्या पुढाकाराने पेद्दाआसापूर येथे भव्य वृक्षारोपण

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, जिवती : पर्यावरण संवर्धनाचा व समाज जनजागृतीचा एक आदर्श उपक्रम म्हणून जिवती पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मोजा पेद्दाआसापूर येथे 20 ऑगस्ट 2025, वार बुधवार रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर व अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात एकूण 250 झाडांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, या वृक्षांचे संवर्धन व सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी गावकऱ्यांना झाडे ‘दत्तक’ देण्यात आली. यामुळे गावकऱ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जबाबदारीची भावना जागृत झाली असून, झाडे केवळ लावणे नव्हे तर त्यांचे संगोपनही समाजाचे कर्तव्य आहे, हा संदेश देण्यात आला.

या प्रसंगी पोलिस ठाणेदार प्रवीण जाधव, PSI पोले, PSI रहाटे यांच्यासह जिवती पोलीस स्टेशनचे एकूण आठ पोलीस अमलदार तसेच महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते. समाजातील विविध घटकांचा सक्रिय सहभाग या कार्यक्रमात दिसून आला. कार्यक्रमाला पेद्दाआसापूर गावातील सामाजिक कार्यकर्ते सुदामभाऊ राठोड, नाईक व्यंकटी पवार, कारभारी किसन जाधव, माजी सरपंच उत्तम राठोड, तसेच जी. प. शाळा पेद्दाआसापूरचे मुख्याध्यापक विशाल सोन्नर सर यांच्यासह हिरामण राठोड, रामेश पवार, गोविंद पवार, गणेश राठोड, गजानन चव्हाण आदी मान्यवर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावातील 60 ते 70 महिला व पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या उपक्रमाला यशस्वीतेकडे नेले. गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानत अशा प्रकारचे उपक्रम समाजात सातत्याने व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिवती पोलीस ठाण्याच्या या उपक्रमामुळे “झाडे लावा – झाडे जगवा” हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला असून, पर्यावरण रक्षणासाठी पोलीस दल आणि नागरिक यांची एकत्रित जबाबदारी अधोरेखित झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत