Breaking News

अंगणवाडी भरते भाड्याच्या खोलीत; कुंभेझरी (मराठगुडा) येथील इमारत मंजूर करण्याची तातडीची मागणी

 अंगणवाडी भरते भाड्याच्या खोलीत; कुंभेझरी (मराठगुडा) येथील इमारत मंजूर करण्याची तातडीची मागणी

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : जिवती तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीपैकी एक असलेल्या कुंभेझरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मराठगुडा येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक 4 ला आजवर स्वतंत्र इमारत उपलब्ध न झाल्याने केंद्रात कार्यरत असलेल्या सेविकेला भाड्याची खोली घेऊन शिक्षण व पोषण उपक्रम राबवावे लागत आहेत.

या अंगणवाडीत सध्या लहान मुलांना शैक्षणिक धडे, उपक्रम तसेच खिचडीसह पोषण आहार देण्यात येतो. मात्र भाड्याच्या खोलीत जागेअभावी मुलांना योग्य शैक्षणिक वातावरण लाभत नाही.

ग्रामपंचायत स्तरावरून बालविकास प्रकल्प कार्यालयासह वरिष्ठ अधिकारी व संबंधित विभागांना वारंवार पत्रव्यवहार करून तसेच प्रस्ताव सादर करूनही आजवर काहीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी माहिती ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. लहुजी गोतावळे यांनी दिली.

त्यांनी प्रशासनावर टीका करताना सांगितले की, “अधिकारी हे त्यांच्या जवळील नेत्यांच्या गावातील कामांना प्राधान्य देतात. मात्र मराठगुडा सारख्या गावांकडे दुर्लक्ष होते. ग्रामपंचायतीतून अनेकदा निवेदने व प्रस्ताव दिले तरीही अंगणवाडी इमारतीबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही,” असे ठळक आरोप त्यांनी केले.

यामुळे स्थानिक पालक वर्गामध्ये तीव्र नाराजी असून, “आपल्या मुलांना कधी प्रशस्त अंगणवाडी इमारत मिळणार? मुलांना सुरक्षित आणि निरोगी वातावरणात शिक्षण घेता येईल का?” असा सवाल उपस्थित होत आहे.

सदर अंगणवाडी इमारत तातडीने मंजूर करून मुलांना भाड्याच्या बंदिस्त खोलीतून मुक्त करून योग्य शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. आता या मागणीवर प्रशासन कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत