सोनुर्लीतील शेतकऱ्यांचे सोयाबीन पिक जलमय; बळीराजाचे मोठे नुकसान
अतिवृष्टीने कापूस–सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : गेल्या पंधरा दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या अतिवृष्टीमुळे कोरपना तालुक्यातील शेती हंगाम ठप्प झाला आहे. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून जमीन चिपचिपीत झाली असून मजुरांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे.
कापसाच्या बोंडांना पकड येत असताना तयार झालेली बोंडे पावसामुळे सडून काळी पडली. यामुळे कापसाचे मोठे नुकसान होऊन उत्पादनावर गंभीर परिणाम होणार आहे. यावर्षी कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
दरम्यान, सोयाबीन पिक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाच्या पाण्याखाली गेले. अनेक शेतकऱ्यांनी पिकाचे नुकसान झाल्याने ट्रॅक्टर फिरवून शेतांची सफाई करण्याची वेळ आली. काही ठिकाणी तुरीचे पिकही उभे सोकू लागले आहे. तर मिरचीला बाजारात भाव नसल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी मिरची पिकाकडे पाठ फिरवली आहे.
नदीकाठच्या गावांमध्ये तिनवेळा पूरस्थिती निर्माण झाली. त्याचे पंचनामे करून अहवाल सादर करण्यात आला असला तरी संपूर्ण कोरपना तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्यामुळे हा ओला दुष्काळ घोषित करून सर्व शेतकऱ्यांना शासकीय मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आबिदअली यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत