‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ई-केवायसी सुविधा सुरू
लाभार्थींनी पुढील दोन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करावी
महा घडामोडी न्यूज विशेष प्रतिनिधी, कमलेश खोब्रागडे, चंद्रपूर : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थींना नियमित आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. योजनेसाठी ई-केवायसी सुविधा आता अधिकृत संकेतस्थळावर https://ladakibahin.maharashtra.gov.in
उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया मोबाईलवरून सहजपणे करता येणार असून, लाभार्थ्यांनी पुढील दोन महिन्यांत ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
तटकरे म्हणाल्या, “ई-केवायसी प्रक्रियेच्या माध्यमातून महिलांना भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवताना मदत होईल. ही पद्धत सुलभ व सुरक्षित आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडता लाभार्थ्यांनी स्वतः ई-केवायसी करून घ्यावे. कोणीही या प्रक्रियेसाठी आर्थिक मागणी करीत असल्यास त्यास बळी पडू नये.”
योजना महिलांसाठी कशी महत्त्वाची?
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्य-पोषण सुधारण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांचा सहभाग दृढ करण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) पद्धतीने महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते. लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण ई-केवायसीद्वारे होणार आहे.
ई-केवायसीची पद्धत
- लाभार्थ्यांनी ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
- मुखपृष्ठावरील e-KYC बॅनरवर क्लिक करून आधार क्रमांक, Captcha कोड भरावा आणि OTP द्वारे प्रमाणीकरण करावे.
- जर लाभार्थी पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्यात पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक देऊन OTP पडताळणी करावी.
- कुटुंबातील शासकीय नोकरी किंवा पेन्शनधारक सदस्य नसल्याचे तसेच केवळ 1 विवाहित व 1 अविवाहित महिला लाभ घेत असल्याचे प्रमाणित करावे.
- सर्व टप्पे पूर्ण केल्यानंतर “Success - तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी सांगितले की, ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून सहजतेने करता येण्याजोगी आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत