Breaking News

मुलमध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवारांचे प्रयत्न

मुलमध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवारांचे प्रयत्न

महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, कमलेश खोब्रागडे, चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा अभियानांतर्गत मुल येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. “जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत आधुनिक व दर्जेदार आरोग्य सुविधा पोहोचवणे हीच खरी जबाबदारी असून यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. या शिबिरातून मातृशक्तीच्या आरोग्य संवर्धनाचा नवा संदेश समाजात पोहोचेल,” असा विश्वास राज्याचे माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

मुल उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आयोजित या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, डॉ. महादेव चिंचोळे, डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. अशोक कटारे, तहसीलदार मृदुला मोरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालयाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी उपजिल्हा रुग्णालये जमिनीअभावी रखडली आहेत. मात्र मुल येथील उपजिल्हा रुग्णालय हे महाराष्ट्रातील पहिले उदाहरण आहे जे जमीन खरेदी करून उभारले जात आहे. साधारणपणे अशा रुग्णालयांसाठी 8 हजार चौ.मी. बांधकामास परवानगी असते; पण मुल येथे तब्बल 15 हजार चौ.मी. मध्ये अत्याधुनिक रुग्णालय उभे राहत आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या आजारांवर उपाय म्हणून 5 बेडचे डायलिसिस सेंटर पुढील महिनाभरात सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर

चंद्रपूर–मुल मार्गावर खड्डे पडू नयेत म्हणून संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रीट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यास मान्यता दिली आहे. तसेच मुल येथील रेल्वे क्रॉसिंगवर ओव्हरब्रिज उभारण्याचीही गडकरी यांनी मंजुरी दिली असून, हा प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण होईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

महिलांसाठी विशेष उपक्रम

मुनगंटीवार म्हणाले, “जनतेची सेवा हेच माझे खरे समाजकारण आहे. कोविड काळात वैद्यकीय साधनसामग्री उपलब्ध करून दिली. आता महिलांच्या आरोग्यासाठी पिंक ओपीडी सुरू करण्याचा मानस आहे, ज्यातून गर्भवती महिलांची विशेष काळजी घेतली जाईल.”

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने या शिबिरात “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यात 3 ते 4 हजार महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून मोफत उपचार, पोषण आहार मार्गदर्शन आणि शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून दिली जाईल.

आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधा आणि शिबिराच्या व्यवस्थेची पाहणी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत