Breaking News

"दारू आणि व्यसनाविरुद्ध मुकदमगुड्यात पोलिसांचा जनजागरण मोर्चा"

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती आणि अनेकदा वादग्रस्त ठरलेल्या मुकदमगुडा गावात दारूबंदी व व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने एक विशेष सभा घेण्यात आली. जिवती पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण जाधव यांच्या उपस्थितीत आयोजित या सभेला गावातील महिला, पुरुष, तरुण व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली.

सभेत ठाणेदार प्रवीण जाधव यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधत दारू व व्यसनांचे दुष्परिणाम स्पष्ट केले. ते म्हणाले, "दारू ही केवळ व्यक्तीच्या आरोग्याला हानी पोहोचवत नाही, तर कुटुंबातील ऐक्य ढासळवते आणि समाजातील गुन्हेगारीलाही खतपाणी घालते. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दारूबंदी व व्यसनमुक्ती ही अत्यावश्यक गोष्ट आहे." यावेळी त्यांनी गावकऱ्यांना आवाहन केले की, दारूबंदी कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने एकजुटीने प्रयत्न करावेत. विशेषतः तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकू नये यासाठी गावाने एकत्रित भूमिका घ्यावी, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

सभेत गावातील महिलांनी दारूबंदीला जाहीर पाठिंबा दर्शवत अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली. महिलांनी आवाज उठविताना स्पष्ट केले की, “गावात शांतता, आरोग्य आणि विकास हवा असेल तर दारूला कायमची बंदी हवी.” दरम्यान, गावातील तरुणांनी व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प करत या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला. तरुणांच्या या निर्धारामुळे सभेला वेगळेच बळ मिळाले.

मुकदमगुड्यासारख्या सीमावर्ती गावात पोलिसांच्या पुढाकाराने घेतलेली ही सभा दारूबंदी चळवळीला नवा वेग देणारी ठरली आहे. स्थानिकांच्या मते, यामुळे गावात सामाजिक ऐक्य वाढून भविष्यात गुन्हेगारी, अवैध धंदे व व्यसनाधीनता रोखण्यासाठी ही बैठक एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत