ओल्या दुष्काळाने घेतला बळी : शेतकऱ्याची आत्महत्या
चिंचोली (खुर्द) येथील घटना; शासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह
महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी, सुवर्णा बेले, राजुरा : सततच्या ओल्या दुष्काळाने आणि वाढत्या कर्जबाजारीपणाच्या ओझ्याने आणखी एका शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. चिंचोली (खुर्द) येथील बाबाजी वासुदेव टोंगे (५५) यांनी रविवारी घरात कोणी नसल्याची संधी साधून विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांना तत्काळ चंद्रपूर जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सोमवारी रात्री ९ वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
यंदाच्या खरीप हंगामात पडलेल्या अवकाळी व मुसळधार पावसामुळे पिकांची स्थिती बिकट झाली आहे. नापिकी व कर्जफेडीच्या विवंचनेत दिवसेंदिवस होरपळणाऱ्या बाबाजी टोंगे यांना या परिस्थितीचा फार मोठा मानसिक आघात बसला होता. खासगी बँकांकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे, याच विचाराने ते त्रस्त होते. शेवटी या असह्य मानसिक ताणाखाली त्यांनी आत्महत्या करून शेतकऱ्यांच्या यातनांची शोकांतिका पुन्हा एकदा समोर आणली आहे.
या घटनेमुळे चिंचोली (खुर्द) परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकऱ्यांचे जीव असेच अकाली गमावत राहणार असतील तर शासनाचे डोके ठणकावले पाहिजे, अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना, कर्जमाफी व दिलासा पॅकेजची गरज असल्याचे मत व्यक्त होत असून, केवळ आश्वासनांनी शेतकऱ्यांचे जीवनमान वाचणार नाही, हे या घटनेने पुन्हा अधोरेखित झाले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत