Breaking News

कापूस पिकांचे पंचनामे तातडीने करा, अन्यथा कपाशी तहसील कार्यालयात आणू — दयानंद राठोड यांचा इशारा

 कापूस पिकांचे पंचनामे तातडीने करा, अन्यथा कपाशी तहसील कार्यालयात आणू — दयानंद राठोड यांचा इशारा

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, हकानी शेख, चंद्रपूर :  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परतीच्या मुसळधार पावसाने कापूस, सोयाबीनसह इतर हंगामी पिकांची स्थिती बिकट झाली आहे. जिवती तालुक्यासह परिसरातील शेकडो एकर क्षेत्रातील कपाशीचे पीक पावसामुळे जमीनदोस्त झाले असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने तातडीने पुढाकार घ्यावा आणि सर्वच ठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी ठाम मागणी शेतकरी नेते दयानंद राठोड यांनी केली आहे. “शेतकरी उद्ध्वस्त होत असताना प्रशासन मात्र मौन बाळगत आहे. जर तात्काळ पंचनामे करून मदतीची प्रक्रिया सुरू झाली नाही, तर आम्ही शेतातील कपाशी उपटून तहसील कार्यालयात आणू,” असा इशारा राठोड यांनी दिला आहे.

राठोड यांनी सांगितले की, दरवर्षी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होत असते; मात्र पंचनामे करण्यात नेहमीच विलंब होतो. कृषी विभाग आणि महसूल प्रशासनातील या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागते. “सरकारने या समस्येकडे गांभीर्याने पाहून तातडीने सर्व तालुक्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करून मदत द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा आम्ही देत आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकरी सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहेत. एकीकडे कर्जाचा बोजा आणि दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीने उध्वस्त झालेली शेती — अशा दुहेरी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या तत्काळ मदतीची गरज आहे. शासनाने तातडीने नुकसानभरपाई जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी सर्वसामान्यांचीही अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत