जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनुर्लीच्या विद्यार्थ्यांचे दैदीप्यमान यश
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनुर्लीच्या विद्यार्थ्यांचे दैदीप्यमान यश
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी शेख हक्कानी चंद्रपूर : पंचायत समिती कोरपना अंतर्गत केंद्र सोनुर्लीची नवरत्न स्पर्धा दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सोनुर्ली येथे अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनुर्ली येथील विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्ता, वक्तृत्व, लेखन, अभिनय व कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करत उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्राथमिक व माध्यमिक गट मिळून एकूण 8 प्रथम क्रमांक व 4 द्वितीय क्रमांक पटकावत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा व संस्कारक्षम अध्यापनाचा ठसा उमटवला.
प्राथमिक गट – प्रथम क्रमांक (एकूण 6)
कथाकथन स्पर्धेत माही चंद्रप्रकाश दुर्गे हिने प्रभावी कथनशैलीने प्रथम क्रमांक मिळवला.
स्वयंपूर्ण भाषण व एकपात्री भूमिका अभिनय या दोन्ही स्पर्धांमध्ये त्रिशा मोरेश्वर सरोदे हिने उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला.
स्वयंस्फूर्त लेखन स्पर्धेत नंदिनी रवींद्र वैरागडे हिने आपली लेखन क्षमता सिद्ध केली.
बुद्धिमापन स्पर्धेत परिधी प्रकाश पडवेकर तर स्मरणशक्ती स्पर्धेत पुन्हा माही चंद्रप्रकाश दुर्गे हिने प्रथम क्रमांक मिळवून आपली गुणवत्ता अधोरेखित केली.
प्राथमिक गट – द्वितीय क्रमांक (एकूण 1)
वादविवाद स्पर्धेत परिधी प्रकाश पडवेकर हिने तर्कशुद्ध मांडणी करत द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
माध्यमिक गट – प्रथम क्रमांक (एकूण 2)
वादविवाद स्पर्धेत कनिष्का कैलास कांबळे हिने अभ्यासपूर्ण मांडणी करत प्रथम क्रमांक पटकावला, तर चित्रकला स्पर्धेत आरोही जयसेन नगराळे हिने आपल्या कल्पकतेने व रंगसंगतीने प्रथम क्रमांक मिळवला.
माध्यमिक गट – द्वितीय क्रमांक (एकूण 2)
स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धेत आकांक्षा छगन देरकर हिने आत्मविश्वासपूर्ण भाषण करून द्वितीय क्रमांक मिळवला, तर एकपात्री भूमिका अभिनय स्पर्धेत हिमानी देवेंद्र उरकुडे हिने प्रभावी अभिनय सादर करून द्वितीय क्रमांक पटकावला.
या सर्व यशामागे शाळेतील गुणवत्तापूर्ण अध्यापन, सातत्यपूर्ण सराव आणि विद्यार्थ्यांतील सुप्त गुण ओळखून त्यांना योग्य दिशा देण्याची परंपरा आहे. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका प्रभावती हिरादेवे यांच्या कुशल नेतृत्वाखाली मेनका मुंडे, विजय राऊत, भास्कर मडावी, सुनिल अलोने व पल्लवी कांबळे या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमासाठी श्री. कल्याण जोगदंड साहेब (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती कोरपना) तसेच श्री. विलास देवळकर साहेब (केंद्रप्रमुख, केंद्र सोनुर्ली) यांनी दिलेली प्रेरणा व मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या शैक्षणिक वाटचालीला नवी ऊर्जा मिळाली असून, भविष्यातही जिल्हा, तालुका व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अशीच घवघवीत कामगिरी करतील, असा विश्वास शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमींनी व्यक्त केला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत