राजुरा क्षेत्रातील पहिले न्यूरोसर्जन डॉ. आशीष नारायण तेल्कापल्लीवार
राजुरा क्षेत्रातील पहिले न्यूरोसर्जन डॉ. आशीष नारायण तेल्कापल्लीवार
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा राजुरा यांच्याकडून सत्कार
राजुरा प्रतिनिधी – राजुरा तहसील येथील बामनवाडा येथील रहिवासी डॉ. आशीष नारायण तेल्कापल्लीवार यांनी नुकतीच कन्याकुमारी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथून वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदवी एम.सी.एच. (न्यूरोसर्जरी) संपादन करून राजुरा परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. ते राजुरा क्षेत्रातील पहिले न्यूरोसर्जन ठरले आहेत.
डॉ. आशीष यांनी आपले प्राथमिक शिक्षण राजुरा तालुक्यातील सिद्धेश्वर, येरगव्हाण आणि देवाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी शिवाजी हायस्कूल, राजुरा येथे इयत्ता ७ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेतले. इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत त्यांनी गुणवत्तायादीत (मेरिट लिस्ट) स्थान मिळवले होते.
कोणत्याही खासगी शिकवणीशिवाय त्यांनी प्रथमच सुरू झालेल्या NEET परीक्षेत उत्तम गुण मिळवून काशीबाई नवले मेडिकल कॉलेज, पुणे येथून एमबीबीएस पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी बी. जे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व ससून रुग्णालय, पुणे येथून एम.एस. पदवी पूर्ण केली आणि पुढे कन्याकुमारी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथून एम.सी.एच. (न्यूरोसर्जरी) ही सर्वोच्च पदवी संपादन केली.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेऊन न्यूरोसर्जन होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास निश्चितच ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या यशामुळे राजुरा तालुक्याला नवी ओळख मिळाली आहे.
डॉ. आशीष यांचे वडील श्री. नारायण तेल्कापल्लीवार हे विरूर (स्टे.) येथे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असून आई गृहिणी आहेत. राजुरा येथे आगमन झाल्यावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा राजुरा यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत