Breaking News

रामपूर ग्रामपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पाला नागरिकांचा तीव्र विरोध

रामपूर ग्रामपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पाला नागरिकांचा तीव्र विरोध
महाघडामोडी न्युज नेटवर्क,लोकेश पारखी 
राजुरा:- राजुरा तालुक्यातील रामपूर ग्रामपंचायत हद्दीत ऐन वस्तीमध्ये सुरू असलेल्या कचरा संकलन व साठवणूक प्रकल्पाच्या बांधकामाला माता मंदिर वार्ड क्रमांक १ मधील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती राजुरा यांच्याकडे लेखी निवेदन देऊन सदर बांधकाम तात्काळ थांबविण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माथरा रोड रामपूर येथे घनकचरा संकलन व साठवणुकीसाठी बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र हा प्रकल्प ऐन वस्तीमध्ये आणि रहदारीच्या मार्गावर उभारला जात असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात या ठिकाणाहून दुर्गंधी पसरण्याची शक्यता असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, सदर प्रकल्पाबाबत ग्रामपंचायतीकडून कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत सूचना फलकावर नोटीस लावण्यात आली नाही तसेच ग्रामसभेत या विषयावर चर्चा करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. काही ग्रामपंचायत सदस्यांनाही याबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले असून त्यामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून सदर बांधकाम तात्काळ थांबवावे व गावाच्या हद्दीबाहेर किमान तीन किलोमीटर अंतरावर, जिथे वस्ती नाही अशा ठिकाणी ग्रामसभा घेऊन सर्वानुमते जागा निश्चित करावी.
या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण रामपूर परिसराचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत