नगरसेवक सूरज पांडे यांच्याविरुद्ध विवाहित महिलेशी विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
सूरज पांडे यांचा आरोप – “ही बदला घेण्याच्या हेतूने करण्यात आलेली कारवाई”
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातील एका ३९ वर्षीय विवाहित महिलेच्या घरी मध्यरात्री जबरदस्तीने प्रवेश करून तिच्याशी अशोभनीय वर्तन केल्याचा आरोप करत भाजपचे नगरसेवक सूरज रामभवन पांडे यांच्याविरुद्ध विनयभंगासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, दि. ६ जुलै रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास संबंधित महिला आपल्या मुलांसह घरी झोपली होती. त्यावेळी तिचे पती कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. याच दरम्यान घराचा दरवाजा जोरजोरात ठोठावण्यात आला. महिलेने दरवाजा उघडताच समोर नगरसेवक सूरज पांडे उभे असल्याचे तिने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
तक्रारीनुसार, पांडे यांनी महिलेच्या पतीबाबत विचारणा करत शिवीगाळ केली. त्यानंतर अश्लील भाषेचा वापर करत महिलेचा विनयभंग केल्याचा तसेच तिला धक्का देऊन जबरदस्तीने घरात प्रवेश केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, स्वतः नगरसेवक असल्याचे सांगून महिला व तिच्या पतीला जीवे मारण्याची तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. महिलेने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. नागरिक येत असल्याचे पाहून संबंधित आरोपी तेथून निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
घटनेनंतर महिलेने गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून गडचांदूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ७४, ७९, ३२९(३) आणि ३५१(२) अन्वये सूरज रामभवन पांडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, नगरसेवक सूरज पांडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत हा गुन्हा खोटा असून बदला घेण्याच्या उद्देशाने दाखल करण्यात आल्याचा दावा केला आहे. तक्रारदार महिलेच्या पतीशी आपली जुनी वैयक्तिक रंजिश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, अलीकडेच बनावट पोलिस दस्तऐवज प्रकरण उघडकीस आणल्याचा आणि गडचांदूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांच्याविरोधात अवैध दारू, सट्टा, गुटखा तसेच इतर अवैध धंद्यांना संरक्षण दिल्याची लेखी तक्रार वरिष्ठांकडे केल्यामुळे आपल्याला जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास गडचांदूर पोलीस करत असून, या आरोप-प्रत्यारोपांमुळे शहरात विविध स्तरांवर चर्चेला उधाण आले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत