विसापूर येथे रेल्वे पादचारी पुलाची मागणी; संदीप पोडे यांचे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना निवेदन
विसापूर येथे रेल्वे पादचारी पुलाची मागणी; संदीप पोडे यांचे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना निवेदन
माहा घडामोडी न्यूज़ नेटवर्क प्रतिनिधी कमलेश खोब्रागडे चंद्रपूर :-विसापूर : विसापूर येथे सुरू असलेल्या पाचव्या रेल्वे लाईनच्या कामाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भविष्यात रेल्वे लाईन ओलांडताना नागरिकांना होणारा संभाव्य त्रास आणि अपघातांचा धोका लक्षात घेता विसापूर येथे रेल्वे पादचारी पुलाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे बल्लारपूर तालुका अध्यक्ष संदीप श्रीहरी पोडे यांनी माजी मंत्री तथा आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विसापूर येथे सध्या पाचव्या रेल्वे लाईनचे काम सुरू असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे मार्ग ओलांडताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दररोज कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. रेल्वे रुळ ओलांडताना संभाव्य अपघात टाळण्यासाठी सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे संदीप पोडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
रेल्वे पादचारी पुलाची उभारणी झाल्यास नागरिकांना सुरक्षितपणे रेल्वे मार्ग ओलांडता येईल. तसेच भविष्यात होणारे संभाव्य रेल्वे अपघात टाळण्यास मदत होईल. त्यामुळे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी या विषयात लक्ष घालून संबंधित रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, पुलाच्या बांधकामाला मंजुरी मिळवून द्यावी आणि प्रत्यक्ष काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पोडे यांनी केली आहे. विसापूरमधील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही मागणी महत्त्वाची असून, रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या मागणीला किती गांभीर्याने घेतात, याकडे आता विसापूरवासीयांचे लक्ष लागले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत