पत्नीने राहत्या घरात गळफास घेत संपवलं जीवन
मोबाइलवर कुणाशी बोलत होती? मोबाईलवरून पती पत्नीमध्ये किरकोळ वाद
पत्नीने राहत्या घरात गळफास घेत संपवलं जीवन
महा घडामोडी न्यूज नागपूर ; नागपूर शहरातील हुडकेश्वर परिसरात एका 31 वर्षीय विवाहित महिलेनं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाइलवर कुणाशी बोलत होती? याबाबत विचारणा केल्यानंतर पती पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला होता. या वादानंतर पती झोपी जाताच संबंधित महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शनिवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. घटनेचचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पूनम मनोज मेहता असं आत्महत्या करणाऱ्या 31 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. त्या नागपूर शहरातील हुडकेश्वर परिसरातील सद्गुरू नगरात पती मनोज शिवप्रसाद मेहता (35) आणि आपल्या लहान मुलासोबत राहत्या होत्या. मृत पूनम यांचे पती मनोज यांचं किराणा दुकान आहे. पती-पत्नीमध्ये सर्वकाही सुरळीत सुरू होतं. पण मागील काही काळापासून मृत पूनमला मोबाइलचं व्यसन जडलं होतं. ती आपल्या पतीपासून लपवून सतत कोणाशी तरी मोबाइलवर बोलायची.
पती जवळ येताच ती पटकण मोबाइल बंद करायची. तसेच कुणाशी बोलत होती? याबाबत विचारणा केल्यानंतरही ती सांगत नव्हती. त्यामुळे पती मनोजच्या मनात संशयाची पाल चुकचुकत होती. त्यामुळे मनोजने पत्नी पूनमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण पूनमचं फोनवर होणारं बोलणं काही कमी झालं नाही. मनोज दुकानातून घरी आल्यानंतर पूनम अनेकदा फोनवर गप्पा मारताना दिसायची. घटनेच्या दिवशी शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास देखील पूनम मोबाइलवर गप्पा मारत होती.
यावेळी मनोजने कुणासोबत बोलतेस हे सांग, असा हट्ट धरला. पण पूनमने काहीच सांगितलं नाही. शेवटी मनोजने पत्नीच्या कृत्याला कंटाळून तिच्या घरच्यांना फोन करून संबंधित प्रकाराची माहिती दिली. मोबाइलवर संभाषण सुरू असल्याची माहिती माहेरी कळाल्यामुळे पूनम अस्वस्थ झाली. यानंतर रात्री उशिरा पती झोपी गेल्यानंतर, पूनमने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत