लखमापूर मराठा लाईमस्टोन खाण विरोधात संताप
चिखलाने व्यापला सिमेंट रस्ता ; अपघाताचा धोका वाढला, – ''खाण बंदचा इशारा" उमेश राजुरकर
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी शेख हक्कानी चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील लखमापूर येथील मराठा लाईमस्टोन खाणीतून ये-जा करणाऱ्या जड वाहनांमुळे सिमेंट रोडवर मोठ्या प्रमाणात चिखल साचत आहे. पावसाळ्यात संपूर्ण रोड चिखलमय होत असल्याने दुचाकी, चारचाकी वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रोडवर घसरून अपघात होण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याने "लाईमस्टोन खाण बंद पाडू" असा इशारा संजय गांधी निराधार समिती कोरपना माजी अध्यक्ष उमेश राजुरकर यांनी दिला.
अंबुजा कंपनी व संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्याची स्वच्छता करून नियमित पाणी व चिखल व्यवस्थापन करावे, तसेच वाहनांच्या चाकांवरील चिखल रस्त्यावर येऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, खाणीतून बाहेर पडणाऱ्या वाहनांसाठी व्हील-वॉश व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याचा आरोप केला आहे. रस्त्याची नियमित स्वच्छता, चिखल रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने कारवाई करण्यात यावी, आता प्रश्न एकच आहे – अजून किती निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर प्रशासन आणि कंपनी जागी होणार?
संबंधित अंबुजा कंपनी आणि प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहे. मात्र, अद्याप कोणत्याही प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या नाही, रस्त्यावरील चिखलामुळे अनेक अपघात घडले असून काही निष्पाप नागरिकांचा जीवही गेला आहे यापुढेही परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर "लाईमस्टोन खाण बंद पाडू" असा इशारा देण्यात आला. - उमेश राजुरकर, मा.अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती, कोरपना
लखमापूर मराठा लाईमस्टोन खाणीतून जड वाहनांमुळे संपूर्ण चिखल रस्त्यावर येत असून अपघात व प्रदूषण होत असल्याबाबतची माहिती मला नाही मी स्वतः जाऊन पाहणी करून तात्काळ निर्णय घेऊ - राम भुवा, युनिट हेड, अंबुजा



कोणत्याही टिप्पण्या नाहीत