'भेदभाव सोडा'नागपूरकर माहिला जगताचा आज लोकजागर
'भेदभाव सोडा'नागपूरकर माहिला जगताचा आज लोकजागर
हजारोच्या संख्येने महिला मॅरेथॉनमध्ये मायलेकी धावणार
'माझी मेट्रो 'चा स्पर्धा काळात मोफत प्रवास
४ लाखाच्या बक्षीसांचे उदया वितरण
सकाळी ७ ते ९ काळात स्पर्धा रंगणार
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत शुभारंभ करतील
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित बक्षीस वितरण
सर्व लोकप्रतिनिधी उपस्थितीत राहणार
शासकीय योजनांचा प्रचार प्रसारही करणार
6 वाजेपर्यंत १7 हजारावर महिलांची नोंदणी
भेदभाव सोडण्याची शपथ ठरणार लक्षवेधी
प्रशासनातील उच्चपदस्थ महिला अधिकारी धावणार
जगभरातील प्रसिध्द महिलांचे छायाचित्र आकर्षण ठरणार
विविध उद्बोधक वाक्यांनी महिला सबळीकरणाचे आवाहन
महा घडामोडी न्युज नेटवर्क,नागपूर : 'भेदभाव सोडा ' 'महिला सुरक्षेला महत्त्व द्या ',रस्ते अपघात टाळा, रस्ता सुरक्षेला महत्त्व द्या अशा अनेक संदेशाला घेऊन उद्या रविवारची पहाट महाराष्ट्रातील आगळ्यावेगळ्या महिला मॅरेथॉनने उघडणार आहे. नागपूर जिल्हा प्रशासनाने या आयोजनाची पूर्ण तयारी केली असून उद्या सकाळी हजारो महिला सात ते नऊ या काळात कस्तुरचंद पार्क येथे लोकजागर करतील अशी माहिती जिल्हाधिकारी आर विमला यांनी दिली आहे.
राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम सुद्धा या मॅरेथॉन स्पर्धेतून होणार आहे. याशिवाय जगभरातील प्रेरणादायी महिला व्यक्तिमत्वाचे पोस्टर्स ठीकठिकाणी उद्या कस्तुरचंद पार्कवर बघायला मिळणार आहेत. उद्या सकाळी कस्तुरचंद पार्क जवळील माझी मेट्रो स्टेशन पर्यंतचा प्रवास महिलांना मोफत असणार आहे. त्यांना आलेला एसएमएस दाखवून मेट्रो मध्ये प्रवास करता येणार आहे. जिल्हा प्रशासनाने या https://forms.gle/aj4DTYYMDhuoULwa6 लिंक वर नोंदणी करण्याचे सांगितले होते. सायंकाळी 6 वाजेपर्यंत 17,400 महिलांनी प्रत्यक्ष नोंदणी केली होती. उदया या मॅरेथॉन स्पर्धसाठी केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री, नागपूर जिल्हा, डॉ. नितीन राऊत,पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रशमी बर्वे, राज्यसभा सदस्य,खा.डॉ.विकास महात्मे,लोकसभा सदस्य,खा. कृपाल तुमाने,विरोधी पक्ष नेते, देवेंद्र फडणवीस, आमदार ना. गो. गाणार, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, चंद्रशेखर बावनकुळे, अनिल देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे, समीर मेघे, अशिष जयस्वाल, राजू पारवे, टेकचंद सावरकर आदींची उपस्थिती राहणार आहे.
लाखो रुपयांची बक्षिसे
जिल्हा प्रशासनाने आज बक्षिसे जाहीर केली असून यामध्ये पाच किलोमीटर मध्ये प्रथम येणाऱ्याला इ स्कूटर दिली जाणार आहे. द्वितीय ४१ हजार, तृतीय ३१ हजार, त्यानंतर अनुक्रमे चौथा ते दहाव्या क्रमांकापर्यंत २१, १५, १०, ८, ६, ५, ४ हजाराची बक्षिसे आहेत. पाच किलोमीटर साठी इ-स्कूटरसह एकूण १ लक्ष ४१ हजाराची बक्षिसाची रक्कम आहे.
तीन किलोमीटरच्या गटासाठी सुद्धा पहिले बक्षीस 41 हजार रुपये आहे तर दुसऱ्या बक्षिसं पासून दहाव्या बक्षिक्षापर्यंत अनुक्रमे ३१, २१, १५, १०, ८, ६, ५, ४, २ हजाराची बक्षिसे आहेत. तीन किलोमीटर साठी एकूण बक्षिसांची रक्कम १ लक्ष आहे.
दोन किलो मीटर फन रन साठी ज्या महिला भगिनी दोन किलोमीटर धावतील व कस्तुरचंद पार्कमध्ये उपस्थित असतील, त्यांच्यापैकी दहा जणांसाठी लकी ड्रॉ द्वारे बक्षिसे दिली जाणार आहे. ही दहा बक्षिसे प्रत्येकी पाच हजाराची असणार आहेत.
महिला स्वयंसहाय्यता गटासाठी दहा बक्षिसे लकी ड्रॉ पद्धतीने ठेवण्यात आली आहे. 'सेल्फ हेल्प ग्रुप ' साठी हे बक्षीस असणार आहे. ५ हजार रुपयांचे १० बक्षीस लकी ड्रॉ पध्दतीने दिले जाणार आहे. जवळपास पाच लक्ष रुपयांची बक्षिसे रविवारच्या महा मॅरेथॉन स्पर्धेत दिली जाणार आहे.
माझी मेट्रो कडून मोफत प्रवासाची भेट
महाराष्ट्रात अशा पद्धतीचा पहिलाच प्रयोग होत आहे. यामध्ये प्रत्येकाच्या घरातील महिला भगिनी उदात्त हेतूने या स्पर्धेत सहभागी होत असल्यामुळे नागपूरकरांचे वैभव असणार्या माझी मेट्रोने देखील जिल्हा प्रशासनासोबत या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेच्या काळात प्रवास करणाऱ्या महिलांना मेट्रोकडून मोफत प्रवास मिळणार आहे. या स्पर्धेसाठी मेट्रोचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे. या काळातील प्रवासासाठी कोणतेच शुल्क मेट्रो आकारणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
पार्किंग व्यवस्था
पार्किंग व्यवस्था पुढील प्रमाणे असणार आहे. सर्व व्हीआययपीसाठी पार्किंग व्यवस्था पुढीलप्रमाणे राहील. संविधान चौक ते झिरो माईल सेक्टर क्रमांक एक, झिरो माइल ते सविधान चौक सेक्टर क्रमांक 2 या भागात व्हीआयपी पार्किंग असेल.
वर्धा रोड अमरावती रोड हिंगणा रोड ग्रेट नाग रोड सीए रोड येथून येणाऱ्या वाहनचालकांनी मॉरीस कॉलेज परिसर सेक्टर क्रमांक ३ ( दुचाकी पार्किंग ) मॉरीस t-point मानस चौक सेक्टर 4 ( चारचाकी व दुचाकी पार्किंग ) पटवर्धन शाळा सेक्टर क्रमांक पाच ( स्कूल बस पार्किंग ) झिरो माइल ते ट्राफिक ऑफिस सेक्टर क्रमांक ६ ( चारचाकी दुचाकी पार्किंग ) प्रिन्स सावजी चे पाठीमागील बाजू ते फारेस्ट ऑफिस चौक सेक्टर क्रमांक सात ( दुचाकी पार्किंग ) मीठा नीम दर्गा ते कन्नमवार चौक सेक्टर 8 ( चारचाकी व दुचाकी पार्किंग ) गुप्ता हाऊस ते सायन्स कॉलेज चौक सेक्टर क्रमांक 9 ( चारचाकी दुचाकी पार्किंग ) सायन्स कॉलेज चौक ते आकाशवाणी चौक सेक्टर क्रमांक 10 ( चारचाकी व दुचाकी पार्किंग)
काटोल रोड, कामठी रोड, कोराडी रोड, गोधनी रोड, येथून येणाऱ्या वाहनचालकांनी पुढील ठिकाणी पार्किंग करावी.
लिबर्टी टॉकीज ते एलआयसी चौक दरम्यानची डावी बाजू ( चारचाकी व दुचाकी पार्किंग) एलआयसी चौक ते पाटणी ऑटोमोबाईल्स t-point दरम्यान डावी बाजू( चारचाकी व दुचाकी पार्किंग) लिबर्टी टॉकीज( चारचाकी व दुचाकी पार्किंग) स्मृती टॉकीज (चारचाकी व दुचाकी पार्किंग).
अशी होईल मॅरेथॉन
सर्व स्पर्धकांनी कस्तुरचंद पार्कमध्ये एकत्रित येणे आवश्यक आहे. सर्व प्रथम पाच किलोमीटरची स्पर्धा सुरू होईल. त्यानंतर तीन किलोमीटरची स्पर्धा चालू होईल. शेवटी दोन किलोमीटरची फन रेस होईल.
5 किमीसाठी ही मॅरेथॉन स्पर्धा कस्तुरचंद पार्क येथून सुरू होऊन संविधान चौक, विधानभवन रस्त्याने, जपानी गार्डन, वॉकर स्ट्रीट, रामगिरी, जिमखाना, व्हीसीए चौक, बीशप कॉलेज, बाटा शोरुम या मार्गाने मार्गस्थ होईल. स्पर्धेचा समारोप कस्तुरचंद पार्क येथेच चौकात होईल.
3 किलोमीटर स्पर्धा कस्तूरचंद पार्क, संविधान चौकातून सुरुवात आकाशवाणी चौक, जीपीओ चौक, लेडीज क्लब, परत वळसा देऊन जीपीओ चौकातून संविधान चौक अशी सांगता होणार आहे.
2 किलोमीटरच्या फन रन स्पर्धेत सविधान चौक ते जीपीओ व परत संविधान चौक अशी स्पर्धा होणार आहे. या फन रनमध्ये सर्वांनीच सहभागी व्हावे, स्वत: जिल्हाधिकारी आर. विमलाही यामध्ये सहभागी होणार आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत