Breaking News

जनावरांच्या मांसाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला चौघे पोलिसांच्या ताब्यात

 जनावरांच्या मांसाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला चौघे पोलिसांच्या ताब्यात 

महा घडामोडी न्यूज नेटवर्क नागपूर ; बेला पोलिसांच्या पथकाने बजरंग दल कार्यकर्त्यांच्या मदतीने शनिवारी (दि. २८) सकाळी ६.३०च्या सुमारास बेला (ता. उमरेड) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्राह्मणी गावाजवळ केलेल्या कारवाईमध्ये जनावरांच्या मांसाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून ट्रक व मांस जप्त करण्यात आले.

या प्रकरणात ट्रकचालक शेख मोहत्ता सिम इमामबत (३२, रा. कामठी), मोहम्मद अब्दुल रहमत (५०), नाजीर प्यारेखान (३२) व रितेश विजय करंडवार (३४) या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (एमएच ४०, वाय ०१६३) क्रमांकाच्या ट्रकमधून जनावरांच्या मांसाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच बजरंग दलाचे सागर जयस्वाल, रॉकी महाजन, जोधराज सिंग, भूषण खुरसंगे व रोहित कुकडे यांनी नागपर शहरातील पिवळी नदी परिसरातून त्या ट्रकचा पाठलाग करायला सुरूवात केली होती.

त्यांनी हा ट्रक ब्राह्मणी गावाजवळ अडवून चालकाकडे चौकशी केली. त्याने असंबद्ध उत्तरे देताच ट्रकची पाहणी केली असता, त्यात मांस आढळताच बेला पोलिसांना सुचना देण्यात आली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून चौघांसह ट्रक व त्यातील मांस ताब्यात घेत पोलीस ठाण्याच्या आवारात जमा केले. याप्रकरणी बेला पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास ठाणेदार पंकज वाघोडे करत आहेत.

मागोवा घेण्यासाठी कारचा वापर

या ट्रकच्या पुढे (एमएच ३१, ८१९१) क्रमांकाची कार होती. त्या कारमधील व्यक्ती ट्रकचालकाला पोलीस आणि इतर धोक्यांची मोबाईल फोनवर सूचना देत होती. या ट्रकविषयी माहिती मिळताच बेला ठाण्यातील वाहतूक पोलीस राजू राठोड व प्रवीण नैनवर यांनी ट्रक व कार ताब्यात घेतली. या कारवाईची माहिती मिळताच नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. त्या ट्रकचा क्रमांक चुकीचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत