Breaking News

बाबू बनून घरी गेले ; १ लाखाच्या दागिन्याने लुबाडले

 बाबू बनून घरी गेले ; १ लाखाच्या दागिन्याने लुबाडले

महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी,नागपूर : दोन महाठगांनी एका व्यक्तीच्या घरी जाऊन भूलथापा देत एक लाख रुपयांचा दागिना त्याच्याजवळून लुबाडून पसार झाल्याची घटना पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे. तुमचे कर्ज मंजूर झाले आहे असे सांगत दोन महाठगांनी खंडाळा मरीयांबी गावातील एका इसमाकडील सोन्याचा दागीना पळविला. ही भयावह अन कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी घटना पारशिवनी तालुक्यातील खंडाळा मरीयांबी गावात घडली.

रमेश नाना मेंघर असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव आहे. रमेश मेंघर खंडाळा मरीयांबी गावातील रहिवासी आहेत. ते आपल्या घरीच उपस्थित होते. त्यावेळी दोन महाठग आले. त्यांनी सांगितले की, आम्ही पंचायत समिती पारशिवनी येथे बाबू आहोत. अचानक बाबू घरी आल्याचे पाहून थोडावेळ रमेश मेंघर यांना हायसे वाटले.

थोड्याच वेळानंतर त्या महाठग बाबूंनी रमेश मेंघर यांना तुम्ही केलेल्या •अर्जानुसार सुमारे १ लाख ३४ हजाराचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. •एवढी मोठी रक्कम मंजूर झाली आणि त्याची माहिती देण्यासाठी स्वतः बाबू आपल्या घरी आल्याचे पाहून रमेश मेंघर अधिकच आनंदी झाले.

खरोखरच 'अच्छे दिन' आले असेच त्यांना वाटले. पण थोड्याच वेळात त्या महाठगांनी आपले रूप दाखविले आणि हातचलाखी करीत लाख रुपयांचा एक सोन्याचा गोफ लंपास केला. हाती सोन्याचा दागीना येताच दोन्ही महाठगांनी रमेश मेंघर यांचे घर सोडले. जेव्हा आरोपी गावाबाहेर पोहोचले तेव्हा कुठे रमेश मेंघर त्या महाठगांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडले. तेव्हा त्यांना आपण फसल्याचे समजले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. तरीही हतबल झालेल्या रमेश मेंघर यांनी पारशिवनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनीही मग सोपस्कार पार पाडत आरोपींच्या विरोधात कलम ४२०, १७०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला पुढील तपास फौजदार पळनाटे करीत आहेत.

पारशिवनी पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी वाढत आहे. अवैध धंदेही मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. दारूचे अड्डे वाढल्याने गावागावात युवक व्यसनाधीन झाले आहेत. मोहफुलाची दारू काढण्यासाठी गुळाचा वापर केला जातो. यात काही व्यापारी लाखो रुपये कमवत आहेत. तर तिकडे पिढी बर्बाद होत आहे. याकडेही पोलिसांचा कानाडोळा होत आहे. अशा सर्वच गोष्टींचा विचार करता पारशिवनी पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी सक्रिय राहण्याची गरज निर्माण होत आहे. तशी मागणी होत असल्याचे चर्चा लोकांमध्ये दिसून येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत