Breaking News

जून्या आठवणीतील लेख प्रेमस्पर्श

 प्रेमस्पर्श 

प्रेम हा शब्द जरी ओठावर आला तरी ओठातील मधूस्पर्श पाझरू लागतात.  पाषाणातूनही प्रेमाच्या धारा कोसळू लागतात.  तना- मनात प्रेम असेल तर असाध्य ते साध्य करण्याची प्रेरणा मुळातच वृद्धिंगत होते.  प्रेम निर्मळ निराकार अगदी पवित्र असतं त्याला त्याग आणि बलिदानाच्या वृत्तीने आणखी पवित्र करता येत. प्रेमाची रूपरेषा आखताना मात्र कुणी सहज 

 विचारलं की प्रेम म्हणजे काय ?  तर ,तर आपण नक्कीच गोंधळतो.कारण जगात प्रेम हा असा एकमेव शब्द आहे की, ज्याची खरीखुरी व्याख्या कुणालाही करता आली  नसावी. आईची बाळाबद्दलची ममता , गाईचे वासरा बद्दलचे वात्सल्य, प्रियकराची प्रेयसी विषयी ओढ अन् निसर्गाच्या झरोख्यातून वाहणारे वारे सारं काही प्रेमचं दर्शविते. म्हणून प्रेमाला ओळखण्यासाठी काळीज आणि पाहण्यासाठी डोळे सतर्क ठेवले तर नक्कीच प्रेमाच्या मोहात पळून जग जिंकण्याचा आनंद मिळतो. डोळे मिटून आत्मपरीक्षण करतांना आपल्याही हळव्या मनाला प्रेमाचा ओलावा हवाहवासा वाटतो.  हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात प्रेमाचाही एक श्वास तेवत असतो.म्हणून प्रत्येकालाच प्रेम हवेहवेसे वाटते ज्याला  प्रेमाचं आकर्षणच नाही अथवा प्रेम नको असे वाटते तो मनुष्यच नव्हे, कारण प्रेमाच्या मातीत जन्मलेला माणूस प्रेमाचा थोरपण गाणार नाही तर ही प्रेमाची केवढी विटंबना. 

समाजात प्रेमाविषयी काही असमंजस लोकांचे विचार , विचार करायला भाग पाडतात, गर्ल फ्रेंड, बाॅय फ्रेंड सारख्या शब्दांचे अर्थाचे अनर्थ करून ठेवलेले दिसतात. एखाद्या पुरूषाची कोणी मैत्रीण किंवा प्रेयसी असू शकते पण, एखाद्या स्त्रीचा मित्र असणं म्हणजे, बापरे. लोक नको ते अर्थ काढून रिकामे होतात का तर ती मुलगी आहे असं परक्या पुरूषासोबत बोलणं म्हणजे पापच नाही का, किती हो तुमचे भिकारडे विचार.जशी तुमची नजर तसंच जग दिसेल तुम्हाला. एखाद्या स्त्रीला देखील हवी असते एका मित्राची साथ, तीलाही हवी असते एक हक्काची जागा जिथे ती तिच मन मोकळं करू शकेल...

बदलत्या काळासोबत प्रेमाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात परिवर्तन होताना आपण पाहतो प्रेम म्हणजे मनावर ताबा ठेवून निस्वार्थ भावनांची उधळण करताना वेळप्रसंगी त्याग  बलिदानात जीवन समर्पित करणे होय. आकाश आणि धरती यांच्यातील प्रेमाचा ज्याप्रकारे पाऊस सांगावा देतो त्याचप्रमाणे दोन जीवाच्या मिलनात दोन मनांच्या आंतरिक भावना हृदयाला घायाळ करतात. तेव्हा नजरेच्या भाषेत गुंग असणाऱ्या प्रेमीयुगुलांना प्रेमातच सर्वस्व जाणवते. प्रेमात रममान होताच, स्वर्गाची सफर करण्याचा आनंद मिळतो. तो त्याच अस्सल प्रेमीयुगुलांना ज्यांच्यासाठी प्रेम पवित्र आहे. तेवढेच मनालाही पवित्र केले तर प्रेमाचा गंध साऱ्या सृष्टीत जाणवेल, तेव्हा कुठे कृष्णाच्या बासरीचा आवाजाचा वेध घेऊन राधा ही प्रेमाच्या तालावर नाचायला लागेल. 

आजच्या युगात स्वार्थ आणि विश्वासघातात पथ चुकलेल्या प्रेमवीरांना जेव्हा खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल तेव्हा जगाच्या नकाशावर प्रेमाचा उद्धार झाल्याचे जाणवेल. प्रेम म्हणजे टाइमपास किंवा फसवेगिरी करण्याचा खेळ नव्हे तर जीवनाला आकार देण्यासाठी अख्ख्या आयुष्याशी घातलेला मेळ असतो. स्वच्छंदी मनावरिल किटकनाशके मारण्यासाठी प्रेमाचे फवारे आवश्यक असतात. म्हणून या प्रेमाला कमी लेकण्याची कदापि चूक करू नये.  कारण प्रेमातही एक बलाढ्य शक्ती आहे आणि विश्वासाच्या नात्याने आणखीही बलाढ्य होत राहील. प्रेमात रंगून प्रेमभंग झाल्याचे आपण ऐकतो पण खऱ्या प्रेमाचा कधीच भंग होत नाही किंबहुना तो वाढतच जातो अविरत. म्हणूनच या सृष्टीच्या कमलपुष्पात उमलेल्या पवित्र प्रेमांकुराला पवित्रतेने सलाम.

लेखक : प्रा. सतिश एस. खोब्रागडे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत