Breaking News

9 जून रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

तृतीयपंथीयांनी ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

कर्ज मेळाव्यासह बँकाच्या इतर योजनांच्या माहितीकरीता

8 जून रोजी ‘ग्राहक क्रेडीट आऊटरीच प्रोग्राम’

 9 जून रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक मंडळाची बैठक


महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर ; : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर अंतर्गत मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे दि. 9 जून 2022 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यामध्ये  महाराष्ट्रातील महिंद्रा अँड महिंद्रा, नागपूर येथील वैभव इंटरप्राईजेस, मिहान येथील नामांकित कंपनी, परम स्किल ट्रेनिंग सेंटर, बडगे इंजिनिअरिंग तसेच स्थानिक समाधान पूर्ती, लोटस हॉस्पिटॉलिटी आदी नामांकित कंपन्यांचा समावेश राहणार आहे. या कंपनीमार्फत एकूण 826 रिक्त पदे भरण्याचे नियोजित आहे.

तरी, जिल्ह्यातील 10वी, 12वी, पदवी, पदव्युत्तर, आयटीआय, अभियांत्रिकी व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांनी या मेळाव्यात सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा. रोजगार मेळाव्याच्या अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, पहिला माळा हॉल क्र. 5 व 6 येथे प्रत्यक्ष अथवा 07172-252295 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.

जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक मंडळाची बैठक

 जिल्हा सैनिक मंडळाची स्थापना शासनाच्या निर्देशाप्रमाणे 25 एप्रिल 2022 रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मान्यतेने तसेच जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे. या मंडळाची बैठक आज (दि.7) जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवृत्त कॅप्टन दीपक लिमसे, अशासकीय सदस्य ॲड भास्कर लाडे, विजय साखरकर, जनार्दन नागपूरे, प्रज्योत नळे आणि अरुण मालेकर उपस्थित होते.

बैठकीत आजी माजी सैनिकांच्या विविध योजना व त्यांच्या प्रगतीचा आढावा घेणे, सैनिक विश्रामगृह, सैनिकी मुला-मुलींचे वसतीगृह निर्माण करणे, चंद्रपूर येथे ईसीएचएस सुविधा, कॅन्टीन सुविधा मिळणे, घरटॅक्स माफीसाठी माजी सैनिक / विधवांना अवगत करणे, शहीद सैनिकांच्या जमिनीबाबतची प्रकरणे निकाली काढण्याबाबत उपाययोजना करणे, राज्य शासनाच्या विविध उपक्रमात माजी सैनिकांना प्रोत्साहित करणे, माजी सैनिकांच्या विधवांचे निवृत्ती वेतनाची प्रकरणे निकाली काढणे, आजी – माजी सैनिक / विधवा / अवलंबित यांच्यावर होणा-या अन्यायाबाबत तात्काळ कार्यवाही करणे, सैन्यदलात भरतीसाठी तरुणांना प्रोत्साहित करणे व भरतीसाठी पोषक वातावारण तयार करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यात सैनिक विश्रामगृहासाठी 81 चौ. मीटर जागा उपलब्ध असून आतापर्यंत घरटॅक्स माफीचे 347 जणांना प्रमाणपत्र वाटप तर माजी सैनिकांच्या विधवांची निवृत्ती वेतनाची सर्व 11 प्रकरणे निकाली काढण्यात आल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. लिमसे यांनी सांगितले.

कर्ज मेळाव्यासह बँकाच्या इतर योजनांच्या माहितीकरीता

8 जून रोजी ‘ग्राहक क्रेडीट आऊटरीच प्रोग्राम’

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या सुचनेद्वारे जिल्ह्यातील शेतकरी व गरजू नागरिकांना बँकांचे कर्ज व इतर योजनांची माहिती व्हावी, या उद्देशाने ग्राहक क्रेडीड आऊटरीच प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे. बुधवार दि. 8 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजता नियोजन भवन, चंद्रपूर येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आाले असून कृषी संबंधित सर्व योजना, कर्ज मेळावा आणि बँकांच्या इतर योजनांची माहिती या कार्यक्रमाद्वारे देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार सुरेश (बाळू) धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, विदर्भ झोनचे प्रबंधक तुषार हाते उपस्थित राहतील. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक व खाजगी बँका सहभागी होणार आहेत. यावेळी बँकेतर्फे तसेच विविध शासकीय योजना राबविणा-या कार्यालयांचे स्टॉल लावण्यात येतील. नागरिकांना योजनांची माहिती देण्यासाठी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.

या मेळाव्यात कृषी संबंधित सर्व योजना व बँकेतर्फे राबविण्यात येणा-या अटल पेंन्शन योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, सुकन्या समृध्दी योजना यासह विविध फ्लॅगशिप प्रोग्राम व योजनांच्या लाभाचे प्रत्यक्ष वितरण प्रमाणपत्र व धनादेश देऊन करण्यात येईल. गरजू लोकांनी मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगळे यांनी केले आहे.

दिव्यांग व्यक्तींकडून स्वयंचलित तीनचाकी सायकलकरीता अर्ज आमंत्रित

 जिल्ह्यातील पात्र दिव्यांग व्यक्तीकरीता स्वयंचलित तीन चाकी सायकल पुरवठा करावयाचा असल्याने जिल्ह्यातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त,समाजकल्याण कार्यालय,चंद्रपूर येथून प्राप्त करावे व स्वयंपूर्ण भरलेले अर्ज दि.24 जून 2022 पर्यंत या कार्यालयात सादर करावे.

याकरीता, लाभार्थ्यांकडे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडचे दिव्यांग प्रमाणपत्र (40 टक्केपेक्षा जास्त), वय वर्षे 18 ते 60 दरम्यान असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे आधारकार्ड, शाळा सोडण्याचा दाखला अथवा जन्म दाखला, रहिवासी दाखला तसेच वैद्यकीयदृष्ट्या तीनचाकी स्वयंचलित सायकल हाताळण्यास सक्षम असल्याबाबतचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तरी,  जिल्ह्यातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.

तृतीयपंथीयांनी ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना केंद्र शासनाच्या नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करून द्यावयाचे असल्याने जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची कागदपत्रासह माहिती आवश्यक आहे.

त्याकरीता तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, तृतीयपंथीयांची मंडळे, संघटनेचे प्रतिनिधीं किंवा स्वतः तृतीयपंथी व्यक्तीने सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, चंद्रपूर या कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधून तृतीयपंथी असल्याबाबतचे वैयक्तिक व रहिवासी पुराव्याबाबतची माहिती त्वरित सादर करावी. जेणेकरून आपल्या माहितीच्या आधारे नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या पोर्टलवर आवश्यक माहिती भरून तृतीयपंथी असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येईल.

तरी, तृतीयपंथीय व्यक्तींनी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत