Breaking News

बॉम्बेझरीत चिखलातून विद्यार्थ्यांची शाळावाट; विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

 अतिदुर्गम आदिवासी गावातील दुरवस्था; विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी शिक्षकांचीच धडपड


महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर :
राजुरा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील बॉम्बेझरी गावातील मूलभूत सुविधांची दुरवस्था पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. नोकरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे जाणारा रस्ता आजही पक्क्या मार्गाऐवजी पाऊलवाटेपुरताच मर्यादित असल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांसह शिक्षकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे गावातील विकासाच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पावसामुळे शाळेकडे जाणारी पाऊलवाट चिखलाने अक्षरशः व्यापून जाते. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचणे कठीण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परिस्थिती इतकी बिकट होते की, काही विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी शिक्षकांना त्यांच्या घरापर्यंत जावे लागते. काही ठिकाणी शाळेपासून सुमारे २०० मीटर अंतरावर विद्यार्थ्यांना चिखलातून उचलून नेण्याची वेळ शिक्षकांवर येत असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात आला आहे.

शाळेकडे जाण्यासाठी रस्ताच नाही; शिक्षण घेणार तरी कसे?

रस्ता, पिण्याचे पाणी, मोबाईल नेटवर्क आणि शैक्षणिक सुविधांचा अभाव यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावातील विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्यास त्यामागे केवळ पालकांची किंवा विद्यार्थ्यांची उदासीनता जबाबदार धरता येणार नाही, तर त्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधा आणि शैक्षणिक वातावरणाचाही विचार होणे आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

बॉम्बेझरी हे गाव माणिकगड सिमेंट कंपनीने दत्तक घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यानंतरही गावातील मूलभूत प्रश्न कायम असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे दत्तक गाव म्हणून झालेल्या विकासकामांची वस्तुस्थिती काय, असा सवालही उपस्थित होत आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांकडून पाहणी

दरम्यान, १४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष सचिन भोयर, कोरपणा तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बॉम्बेझरी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

पाहणीनंतर सचिन भोयर यांनी व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया देताना, आदिवासी भागातील या गावाच्या विकासाकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. विविध काळात लोकप्रतिनिधींनी सत्ता भूषविली; मात्र बॉम्बेझरीसारख्या अतिदुर्गम गावाला आवश्यक पायाभूत सुविधा अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत, असा दावा त्यांनी केला.

भोयर यांच्या म्हणण्यानुसार, शाळेत पिण्याच्या पाण्याची सुविधा अपुरी आहे. शाळेच्या परिसरात वाढलेले गवत आणि झुडपांमुळे विषारी जीव-जंतूंचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच संगणक आणि एलईडी टीव्हीसारखी उपलब्ध शैक्षणिक साधने बंद अवस्थेत असल्याचा दावाही त्यांनी केला.

मोबाईल नेटवर्कचा अभाव; आपत्कालीन सेवांशी संपर्काचे आव्हान

गावात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत १०८ रुग्णवाहिका किंवा ११२ यांसारख्या सेवांशी संपर्क साधणेही अडचणीचे ठरत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. अतिदुर्गम भागात आरोग्य व आपत्कालीन सेवांशी तातडीने संपर्क साधण्यासाठी दळणवळणाची सुविधा असणे अत्यावश्यक असल्याने हा प्रश्न गांभीर्याने घेण्याची मागणी होत आहे.

सध्या शाळेत इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षणाची सुविधा असून एक शिक्षक व एक शिक्षिका कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांची संख्या कमी असण्यामागे गावातील पायाभूत सुविधांचा अभाव हे एक कारण असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

‘सुविधा नसतील तर मुलांनी शिक्षण घ्यायचे कसे?’

यावेळी स्थानिक आदिवासी युवकांनीही आपल्या समस्या मांडल्या. “आमच्या मुलांवर शिक्षण घेत नाहीत, असा आरोप केला जातो. मात्र रस्ता, मोबाईल नेटवर्क, शैक्षणिक सुविधा आणि इतर मूलभूत सोयींचाच अभाव असेल, तर मुलांनी शिक्षण घ्यायचे कसे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

भूमिपूजन झाले; रस्ता मात्र अद्याप अपूर्ण

शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे माजी आमदार संजय धोटे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते, असा दावा सचिन भोयर यांनी केला. मात्र, भूमिपूजनानंतरही रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे संबंधित यंत्रणेने या रस्त्याच्या कामाची सद्यस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी पुढे आली आहे.

दरम्यान, मनसे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी केलेल्या या आरोपांबाबत संबंधित प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच माणिकगड सिमेंट कंपनीची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या आरोपांची वस्तुस्थिती आणि संबंधित विकासकामांची अधिकृत नोंद याबाबत प्रशासनाकडून स्पष्टीकरण अपेक्षित आहे.

तातडीने उपाययोजनांची मागणी

बॉम्बेझरी गावातील विद्यार्थ्यांची पावसाळ्यात होणारी गैरसोय लक्षात घेता शाळेकडे जाणारा रस्ता तातडीने तयार करावा, शाळेत नियमित व सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, बंद असलेली डिजिटल शैक्षणिक साधने सुरू करावीत आणि गावातील मोबाईल नेटवर्कचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अतिदुर्गम भागातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न केवळ शाळेच्या चार भिंतींपुरता मर्यादित नसून त्यासाठी रस्ता, दळणवळण, पाणी आणि सुरक्षित वातावरण या मूलभूत सुविधांचीही गरज आहे. त्यामुळे बॉम्बेझरीच्या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन प्रत्यक्ष उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत