Breaking News

वीज गेल्यावर चमचमणारी गॅसबत्ती चालली आता भंगारात

 वीज गेल्यावर चमचमणारी गॅसबत्ती चालली आता भंगारात

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, नरेंद्र मेश्राम, लाखनी : ग्रामीण भागातील सार्वजनिक कार्यक्रमात रात्रीच्या वेळी अचानक विद्युत बंद झाल्यास कार्यक्रम स्थळी सर्वत्र अंधार होत असे.अशावेळी हमखास त्या ठिकाणी गॅस बत्ती चा उपयोग केल्या जात असे. आणि क्षणार्धात त्या ठिकाणी लखलखाटलाट केल्या जात असे. ही किमया केवळ गॅस बत्ती मुळे साधल्या जात होती.

     आजपासून सुमारे पंधरा-वीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागात जनरेटरची सोय उपलब्ध नसताना, किंवा इतर विद्युत साधने उपलब्ध नसताना रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी गॅस बत्ती उपलब्ध केल्या जात असत. अचानक विद्युत गेल्यास तेथील अंधार दूर करण्यासाठी ही गॅस बत्ती अतिशय महत्वाची भूमिका बजावत असे. अगदी विद्युत दिवा सदृश्य लख्ख प्रकाश या गॅसबत्तीच्या माध्यमाने सर्वत्र पाहायला मिळत असे. या गॅस बत्त्या राकेल या इंधनावर चालणाऱ्या होत्या आणि त्या काळात राकेल सर्वत्र मुबलक,सहज व मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने आणि गॅस बत्ती सुद्धा सहज उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील जनता कार्यक्रमस्थळी यांचा मोठ्या प्रमाणात वापर करत असत. मात्र काळाच्या ओघात यांत्रिकीकरणामुळे व विद्युत दिवे उपलब्ध असल्याने या गॅस बत्त्या कालबाह्य झालेल्या आहेत.

        ग्रामीण भागातील अनेक लोक कार्यक्रम स्थळी या गॅस बत्त्या किरायाने देण्यासाठी आपल्याजवळ त्यांच्या मुबलक साठा ठेवत असत. 15 ते 20 रुपये प्रति गॅसबत्ती , प्रती रात्र या प्रमाणे त्या किरायाने पुरविल्या जात असत. त्यामुळे त्यांना त्यापासून अर्थार्जन सुद्धा होत असे मात्र आता विद्युत जनरेटर व तत्सम साधने निघाल्याने या गॅसबत्तीवर अवकळा आलेली असून त्या आता भंगारात विकल्या जात आहेत.

    कोलारी येथील दौलत नकटू बावनकुळे यांच्याजवळ सुद्धा दहा-पंधरा वर्षे आधी पंधरा ते वीस गॅस बत्या उपलब्ध होत्या गावात व परिसरात त्या बत्त्या ते भाड्याने देत असत.आता त्यांनी त्या निरुपयोगी असल्याने भंगारात विक्रीला काढलेल्या आहेत. त्यांच्या या गॅस बत्त्या अनेक सार्वजनिक कार्यक्रमाच्या प्रत्यक्ष साक्षीदार ठरलेल्या आहेत. त्यांची जागा आता विद्युत च्या इतर साधनांनी घेतल्यामुळे त्या आता कालबाह्य झाले असून त्या गॅस बत्या त्यांनी आता भंगारात विक्रीला काढले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत