छंदवेडे मेश्राम गुरुजींची आगळीवेगळी परसबाग
छंदवेडे मेश्राम गुरुजींची आगळीवेगळी परसबाग
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी नरेंद्र मेश्राम भंडारा : "असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावुन अत्तर,नजर रोखुनी नजरे मध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर "या विंदा करंदीकरांच्या काव्यपंक्ती काही अंशी लागू होतात त्या लाखनी तालुक्यातील कोलारी येथील उमेश टिकाराम मेश्राम गुरुजी उर्फ युटी सर यांना गावात व परिसरात युटी सर या नावाने ओळखले जाणारे मेश्राम गुरूजी खऱ्या अर्थाने अफलातुन व्यक्तिमत्व आहेत. नानाविध छंद जोपासणारे युटी सर जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक असून त्यांनी अनेक छंद जोपासले आहेत.कला ही माणसाचे जीवन बनावे व छंद हे व्यसन बनावे अशा कलंदर व्यक्तिमत्त्वाचे धनी असणारे मेश्राम सरांची ही यशोगाथा.
या छंद वेड्या मेश्राम सरांनी आपल्या घरी विविध प्रजातींची फळझाडे व फुलझाडे लावून आगळीवेगळी परस बाग फुलविली, त्यात सफरचंद,आंबे,त्यामध्ये हापुस, कलमी आंबा ,लंगडा, दसेरी,बैगनपल्ली तसेच इतर फळझाडामध्ये बोर, शेवगा ,करवंद ,द्राक्षे, आवळा ,ऑस्ट्रेलियन आवळा, जांभूळ, फणस, मोसंबी ,नारळ ,काजू ,आमरस ,पेरू,कोहळयाच्या आकाराचा हायब्रीड ईडलिंबू ,केळी ,डाळिंब ,सीताफळ, चिकू, लिंबू, सुरण पपई ,इतकेच नव्हे तर विड्याचे पान ,बदाम इत्यादी मौल्यवान आणि दुर्मिळ फळझाडांच्या अंतर्भाव असून फुल झाडांमध्ये कमळ ,गुलाब, रजनीगंधा, मोगरा, झेंडू, जास्वंद ,रातराणी, गुलमोहर, लाजरी ,कृष्णकमळ ,निशिगंधा, लीली एप्रिल फूल, मे फुल,मधुमालती, सूर्यफूल, डेलिया, कुंदा, शेवंती अशा दुर्मिळ सुगंधी फूल झाडांचा समावेश आहे. मेश्राम सरांच्या या परसबागेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी घराच्या गच्चीवर सुद्धा छोटेखानी बाग तयार केली असून तिथेही असंख्य फुलझाडे फुलविले. उन्हाळ्याच्या दिवसात या गच्चीच्या खाली थंडगार गारवा मिळत असतो.
मेश्राम सर स्वभावाने अतिशय नम्र ,साधे व गोड स्वभावाचे असून त्यांच्या या नानाविध फळा फुलांच्या झाडे जोपासण्याच्या पद्धतीमुळे ते परिसरात नेहमी चर्चिले जातात. मेश्राम सर फळा फुलांना जपण्या बरोबरच समाज कार्यासाठी सुद्धा सदैव तत्पर असतात. विशेषत: लहान मुलांसाठी संस्कारक्षम उपक्रम ते नेहमीच राबवितात. या ध्येयवेड्या माणसाच्या अंगी इतरही अनेक कला अवगत आहेत त्यात सुंदर हस्ताक्षर ह्या सोबतच चित्रकलेतही त्यांना विशेष रुची आहे. मेश्राम सरांनी रेखाटलेल्या समाजसुधारकांची चित्रे व निसर्ग चित्रे त्यांच्या घरी येणा-या- जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही .सरांनी ही कला केवळ आपल्यापुरती मर्यादित ठेवली नाही तर स्वतःच्या उत्कर्ष नावाच्या इयत्ता बारावीत शिकणाऱ्या मुलालाही त्यांनी त्यात तरबेज केले. उत्कर्ष यांनी रेखाटलेली विठ्ठलाची चित्रे ,राधाकृष्ण ,गजाननाची चित्रे ,ताजमहल व अनेक निसर्ग चित्रे घरी आलेल्यांचे निश्चितच लक्ष वेधून घेतात, विशेष म्हणजे उत्कर्षाच्या अंगी चित्र कले सोबतच हार्मोनियम, बँजो, तबला हे वाद्य वाजविण्याची सुद्धा कला अवगत आहे.
अश्या या छंद वेड्या मेश्राम सरांना त्यांचे छंद जोपासण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांचे शुद्धा निश्चितच मोलाचे सहकार्य लाभत असून मेश्राम सरांनी व्यवसाय सोबतच जोपासलेल्या या कलेच्या छंदाची प्रेरणा समाजातील इतरांनी घ्यावी.व मानवी जीवनात निसर्ग हाच केवळ मानवी जीवन सुसह्य व सुखकर करू शकतो, त्यासाठी मानवाने निसर्गाशी एकरुप व्हावे व निसर्गाला आत्मसात करावे असे मत मेश्राम सर यांनी व्यक्त केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत