धान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रु बोनस द्या :आ.नरेंद्र भोंडेकर यांची मागणी.
धान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रु बोनस द्या :आ.नरेंद्र भोंडेकर यांची मागणी...
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, भंडारा : पूर्व विदर्भातील भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,गडचिरोली, नागपूर ,वर्धा या जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जात असून शेतकऱ्यांना ७०० रु प्रतिक्विंटल धानाला बोनस देण्यात यावा अशी मागणी आज आमदार नरेन्द्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. धान पिकाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्यामुळे पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकरी फार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
बियाणे, खते,औषधी यांच्या वाढलेल्या किमती,मजुरी खर्चात झालेली वाढ,डिझेलचे वाढलेले दर यामुळे धान पिकाच्या लागवड खर्चात प्रचंड वाढ झालेली आहे.त्यातुलनेत केंद्र सरकारने प्रतिक्विंटल १९४० रु जाहीर केलेला हमीभाव अत्यल्प आहे. या शिवाय कधी ओला दुष्काळ,तर कधी कोरडा दुष्काळ या नैसर्गिक आपत्तीचा सामना सुद्धा शेतकऱ्यांना करावा लागतो. या सर्व अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने २०० रु तर राज्य सरकारने ५०० रु असा ७०० रु प्रतिक्विंटल बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
राज्यातील आघाडी सरकारने 2021-22 च्या खरीप हंगामात बोनस बंद केला,यामुळे धान उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला असून शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे.तरीपण 2021 -22 या खरीप हंगामातील बोनस शेतकऱ्यांना देण्यात यावा तसेच 2022-23 या खरीप हंगाम पासून नियमित 700 रु बोनस देण्याची मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.यावर तातडीने आढावा घेऊन शेतकरी हिताचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिल्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत