Breaking News

कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या तक्रारीसाठी समिती अनिवार्य

 

कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या तक्रारीसाठी समिती अनिवार्य

50 हजार रुपयापर्यंत दंडात्मक कार्यवाही

महा घडामोडी न्यूज नेटवर्क, चंद्रपूर : जिल्ह्यातील दहापेक्षा जास्त कामगार/ कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय व खाजगी , आस्थापना मालकांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार "अंतर्गत तक्रार समिती" गठीत करणे अनिवार्य आहे.

सदर समिती गठीत करण्याबाबत माहिती सादर करण्यास दिरंगाई झाल्यास अधिनियमातील नियमाप्रमाणे सदर आस्थापना 50 हजार रुपयापर्यंत दंडात्मक कार्यवाहीस पात्र राहील.  जिल्ह्यातील दहापेक्षा जास्त कामगार व कर्मचारी असलेल्या सर्व आस्थापना मालकांनी https://ee.humanitarianresponse.Info/x/mcRhfeTy या लिंकवर आस्थापनेची माहिती भरून घ्यावी. सदर लिंकमध्ये सबमिट केलेली माहिती चंद्रपूर, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या assttcommrchd@gmail.com या ई-मेल आयडीवर कळवावे. माहिती भरतांना काही अडचण आल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त एम.पी. मडावी यांनी केले आहे.


5 जून रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  लोकशाही  दिनाचे आयोजन  दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. या लोकशाही दिनानिमित्त नागरिक व शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात.माहे, जून  महिन्याचा पहिला सोमवार, दिनांक 5 जून  रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे लोकशाही दिनाचे  आयोजन  करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय  लोकशाही  दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका  लोकशाही  दिनातील  टोकन क्रमांकाची  प्रत तसेच अर्ज 15 दिवसाआधी 2 प्रतीत सादर करावा.  तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. तद्नंतरच तक्रार अर्ज स्वीकारण्यात येईल,  लोकशाही  दिनात नागरिकांनी मास्क घालणे व सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य राहील, असे निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी कळविले आहे.

वटवृक्षारोपण महोत्सव 3 जून रोजी

 जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व खाजगी संस्थांच्या मदतीने जिल्ह्यात 3 जून रोजी वटवृक्ष वृक्षारोपण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वृक्षरोपणाचा कार्यक्रम सकाळी 9 वाजता अटलबिहारी वाजपेयी क्रीडासंकुल, बायपास रोड जुनाना चौक येथे होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन तसेच अभिनेत्री स्नेहल राय उपस्थित राहणार असल्याचे उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो) पल्लवी घाटगे यांनी कळविले आहे.


 जिल्ह्यात 2 व 3 जून रोजी उष्णतेच्या लाटेची शक्यता

विशेष काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 भारतीय हवामान खात्‍याने चंद्रपूर जिल्‍ह्यात दिनांक 2 व 3 जून, 2023 रोजी उष्‍णतेच्‍या लाटेची शक्‍यता वर्तविलेली आहे. या अनुषंगाने नागरिकांनी पुढीलप्रमाणे विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता (काय करावे ?)

पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा. दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा, सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्‍यात यावा. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्‍यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा.अशक्‍तपणा, डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्‍हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.  गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.         

घर थंड ठेवण्यासाठी पडदे शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सुर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे. पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये-मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करावा. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी. अधिक उपाययोजनेसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या @SDMAMaharashtra या ट्विटर, फेसबुक व कु अॅपवरील सूचना पहाव्यात.

उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता(काय करु नये ?) :

उन्हात अतिकष्टाची कामे करू नका. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका. दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.उन्हापासून बचावासाठी वरिल सुचनांचे पालन करावे.


राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईत 91 गुन्ह्यांची नोंद

जिल्ह्यातील अवैध दारु विक्री व हातभट्टीदारु निर्मीती, विक्री, वाहतुक विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत माहे मे महिन्यात विशेष मोहीम आयोजित करण्यात आली होती. यात भद्रावती, वरोरा, चिमुर, चंद्रपुर, सिंदेवाही, राजुरा, मुल, बल्लारपुर, ब्रम्हपुरी, नागभीड या तालुक्यात धाडी टाकुन महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत एकुण 91 गुन्हे नोंदविण्यात आले.

 या गुन्ह्यांमध्ये एकुण 68 आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवुन संपुर्ण कार्यवाहीमध्ये चारवाहनांसह एकुण रुपये पाच लाख 70 हजार 60 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच वरोरा भागात दोन देशी दारु किरकोळ विक्री दुकानांवर नियमभंग प्रकरणे नोंदविण्यात आले आणि मुंबई दारुबंदी कायद्याचे कलम ९३ अंतर्गत एकुण १३ इसमांवर प्रतीबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव दाखल करण्यात आले. सदर कामगिरी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाद्वारे पार पाडली.

जिल्हाधिकाऱ्यांनी  केली आनंद वाईन शॉपची अनुज्ञप्ती 15 दिवसांकरिता निलंबित :

अनुज्ञप्ती नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपूरच्या सराई वार्ड, जटपुरा गेटजवळील आनंद वाईन शॉपची अनुज्ञप्ती 15 दिवसांकरिता निलंबित केली असल्याचे आदेश काल (दि.31 मे) निर्गमित केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत