Breaking News

अमलनाला धरणातील पाणी हिरवट; नगरपरिषद सतर्क, नागरिकांमध्ये संभ्रम

 अमलनाला धरणातील पाणी हिरवट; नगरपरिषद सतर्क, नागरिकांमध्ये संभ्रम

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर :  गडचांदूर शहराची तहान भागविणाऱ्या अमलनाला धरणातील पाण्याचा रंग अचानक हिरवा झाल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल ५० हजार लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या या धरणातील पाण्याच्या बदललेल्या रंगामुळे नागरिकांमध्ये चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, सुमारे सात वर्षांपूर्वीही अमलनाला धरणातील पाणी हिरवे झाले होते. मात्र त्यावेळी या पाण्याचा वापर प्रामुख्याने शेती व औद्योगिक कारणांसाठी केला जात होता. २०२२ पासून याच धरणातील पाणी गडचांदूर शहरासाठी पिण्याच्या वापरात येत असल्याने सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

पाण्याचा रंग हिरवा होण्यामागे नेमके कारण काय? जलाशयातील शेवाळ, जलवनस्पती अथवा अन्य रासायनिक घटकांमुळे हा बदल झाला आहे का? या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता आहे का, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत अमलनाला धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरू नये, अशा सूचना गडचांदूर नगरपरिषदेने नागरिकांना दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच संभ्रम निर्माण झाला असून, पाण्याची तातडीने शास्त्रीय तपासणी मागणी होत आहे.

नागरिकांना आम्ही विविध माध्यमातून पिण्या करिता पाण्याचा वापर करून नये असे आवाहन केले आहे. पिण्याच्या पाण्या करिता शहरातील सर्व आरो प्लॅन्ट खुले केले आहे. काही ठिकाणी शुद्ध पीण्याचे पाणी टँकर द्वारे पोहचता करीत आहोत. 2018 मध्ये देखील तलावाचे पाणी असेच हिरवे झाले होते. संबंधित विभागाशी बातचीत सुरू असून तपासणी करिता पाण्याचे नमुने घेतले आहे :- नगराध्यक्ष निलेश ताजने, नगरपरिषद, गडचांदूर

पहाडावरील नाल्या, धोंड्यातून आणि सिमेंट कंपनीचा माइन्स मधून पाणी वाहत अमलनाला धरणात येत असल्याने पाण्याची तपासणी करणे गरजेचे आहे. नगरपरिषदेने जबाबदारी घेत उपाय योजना सुरू केल्या आहे जिल्हा प्रशासनाने दखल घेत संशोधक पद्धतीने तपासणी करावी आणि पाणी हिरवे होण्यामागचे नेमके कारण स्पष्ट करावे:- मनोज भोजेकर, सामाजिक कार्यकर्ता, गडचांदूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत