जिवती शहरात अल्पवयीन दुचाकीस्वारांचा सुळसळाट
रस्त्यांवर बिनधास्त दुचाकीस्वारी; वाहतूक पोलिसांच्या कारवाईची नागरिकांची मागणी
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर, जिवती : शहरात अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, वाहतूक नियमांना अक्षरशः हरताळ फासला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ तसेच शाळा परिसरात अल्पवयीन मुले बिनधास्तपणे दुचाकी चालवताना दिसत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अनेक अल्पवयीन दुचाकीस्वारांकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नसतानाही ते सर्रास दुचाकी घेऊन रस्त्यावर येत आहेत. काही जण भरधाव वेगाने वाहन चालविणे, अचानक कट मारणे, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे तसेच हेल्मेटचा वापर न करणे अशा प्रकारे वाहन चालवताना दिसून येतात. त्यामुळे अन्य वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
शाळा सुटण्याच्या वेळेत विशेष वर्दळ
शाळा सुटण्याच्या वेळेत तसेच सकाळच्या सुमारास शहरातील रस्त्यांवर अल्पवयीन दुचाकीस्वारांची मोठी वर्दळ दिसून येत आहे. अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी सोपविणाऱ्या पालकांच्या भूमिकेवरही यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुलांच्या हट्टापायी किंवा निष्काळजीपणामुळे भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची मोठी किंमत कुटुंबाला तसेच संबंधित व्यक्तींना मोजावी लागू शकते.
पालकांनीही जबाबदारी ओळखण्याची गरज
अल्पवयीन मुलांना दुचाकी चालविण्यास देणे हे केवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन नाही, तर त्यांच्या जीविताशी खेळण्यासारखे आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांच्याकडे दुचाकी देणे टाळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी
शहरातील वाढता प्रकार पाहता वाहतूक पोलिसांनी जिवती शहरात विशेष तपासणी मोहीम राबवावी. अल्पवयीनांकडून दुचाकी चालविण्याचे प्रकार आढळल्यास संबंधित वाहनधारक व पालकांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच शाळा परिसरात वाहतूक नियमांबाबत जनजागृती मोहीम राबवून विद्यार्थ्यांना नियमांचे पालन करण्याचे महत्त्व समजावून सांगण्याची गरज आहे.
नियमांचे पालन, पालकांची जागरूकता आणि प्रशासनाची कडक अंमलबजावणी या तिन्हींच्या समन्वयातूनच अल्पवयीन दुचाकीस्वारांचा वाढता धोका रोखता येणार आहे. एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा जिवतीकरांकडून व्यक्त होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत