Breaking News

दुर्गेशच्या शेतात चमकली ' बिजली ' ! कृषी अधिकाऱ्यांनी केली प्रशंशा

 फुलशेतीतून २.४० लाखाचे उत्पादन, तर २ लाख रुपये निव्वळ नफा

छायाचित्र - बिजली (डेझी) फुलशेतीची पाहणी करताना कृषी अधिकारी व उपस्थित शेतकरी दुर्गेश वाघमारे.

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, विनोदकुमार डांगरे, बेला : सोनेगाव लोधी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेला असणाऱ्या मांगली या लहानशा खेड्यातील दुर्गेश व मंगला वाघमारे या युवा दाम्पत्याने बिजली (डेझी) या फुलाची शेतात लागवड करून भरघोस उत्पादन घेतले. त्यांच्या शेतावर भेट दिली असता जणू त्यांच्या शेतात बिजली चमकली. असे मनोहारी दृश्य पहायला मिळते. ९० दिवसाच्या कालावधीत त्यांना २.४० लाखाचे भरघोस उत्पादन झाले आहे.

   मध्यमवर्गीय साधारण कुटुंबातील दुर्गेश बीए शिक्षित आहे.गेल्या ४ वर्षापासून वाघमारे दांपत्य २ एकर शेतजमिनीत आळीपाळीने फुलशेतीची लागवड करत आहे. बिजली (डेझी) हे ९० दिवसाचे पीक आहे. त्यातील ६० दिवस झाल्यानंतर फुल तोडणीला येते. फुल तोडणीचे काळात दुर्गेश पहाटे ४ वाजता नागपूरच्या मार्केटला फुले घेऊन जातात. ४५ किलोमीटरचा त्यांचा हा प्रवास स्वतःच्या दुचाकीवरून असतो.

 दर पाच दिवसांनी पाच-सहा क्विंटल फुलाचे उत्पादन त्यांना होत आहे. सरासरी किलोमागे ४० रुपये भाव, याप्रमाणे एका तोड्याला २० हजार रुपये नुसार त्यांना फक्त तीन महिन्यात एकरी १ लाख २० हजार याप्रमाणे  दोन एकरात २.४० लाख रुपयाचे भरघोस उत्पादन झाले.लागवड व इतर खर्च एकरी वीस हजार रुपये झाला. त्यानुसार ४० हजार रुपयाचा खर्चवजा जाता दोन एकरात त्यांना दोन लाख रुपयाचा निव्वळ नफा झाला. त्यातून त्यांनी ग्रामीण शेतकऱ्यांसमोर उन्नतीचा आदर्श नमुना ठेवला आहे.कृषी विभागाच्या वेळोवेळीच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी कीड व रोगांपासून फुलाचा बचाव केला आहे.मात्र भाव पडण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याची खंत वाघमारे यांनी व्यक्त केली.

---------------------------------------------------------------------

  कृषी अधिकाऱ्यांनी दिली भेट 

   कृषी विभागाच्या वतीने नुकतेच मांगली येथे शेतीशाळा व प्रशिक्षण घेण्यात आले. त्यावेळी तालुका कृषी अधिकारी मनीषा थेरे, मंडळ कृषी अधिकारी युवराज चौधरी, कृषी पर्यवेक्षक लता टोंगलवार आणि कृषी सेवक प्रशंशा नाईक व शिवम कदम यांनी त्यांचे फुलशेताला भेट देऊन पाहणी केली व कष्टाळू वाघमारे दांपत्याचे अभिनंदन करून कौतुक केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत