Breaking News

Nagpur : औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात तणाव, महालमध्ये दोन गटात दगडफेक

 नागपूरमधील महाल परिसरात नेमकं काय घडलं? स्थानिकांनी सगळं सांगितलं

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, नागपूर : नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. महाल परिसरामध्ये दोन गट आमने सामने आले आहेत. सकाळी औरंगजेबाच्या कबरीविरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात आलं होतं, यानंतर संध्याकाळी दोन गट आमने-सामने आले आहेत. संतप्त जमावाने दगडफेक करत काही वाहनांची तोडफोडही केली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान झालं. या धुमश्चक्रीमध्ये काही पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले आहे. महाल परिसरामध्ये तणाव वाढल्यानंतर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.

नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावं, - मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस

नागपूर हे शांतता आणि सौहार्दासाठी देशभरात प्रसिद्ध असलेले शहर आहे. या शहरात जात-पंथ-धर्म या विषयावरून वाद किंवा भांडण होत नाही. आज जे काही घडले, त्यासंबंधी प्रशासन कार्यवाही करेलच. नागपूरच्या सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि शांतता प्रस्थापित होईल, यासाठी स्वत: देखील प्रयत्न करावे, - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री 

______________________________________________

हिंसाचारात पोलीस उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला


औरंगजेबची कबर हटवण्याच्या मागणीसाठी एकीकडे हिंदुत्वादी संघटना आंदोलन करत आहे. तर अशातच नागपूरमध्ये सोमवारी संध्याकाळी हिंसाचाराची घटना घडली आहे. महाल परिसरामध्ये दोन गटामध्ये वाद झाला. या गटाने जोरदार दगडफेक केली आणि जाळपोळही केली. यावेळी पोलिसांवरही हल्ला करण्यात आल्याचं समोर आलं आहे. दंगलीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात कलम 163 लागू करण्यात आले आहे. नागपुरात जमावबंदीचे आदेशही लागू केले आहे.

महाल परिसरात दोन गटामध्ये तणाव निर्माण झाला. या जमावाने दगडफेक करत जाळपोळ केली. घटनास्थळी पोलीस दाखल होते. यावेळी जमावाने पोलिसांवरही हल्ला केला.

उपायुक्त निकेतन कदम यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. जमावातील अज्ञात व्यक्तीने कदम यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. तर, नागपूरच्या महाल भागामध्ये जी घटना घडली आहे. ती अतिशय दुर्दैवी आणि चुकीची आहे. माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे, सर्वांनी कायदा आणि सुवव्यस्थेचं पालन करावं. नागपूर हे एकोप्यानं राहणारं शहर आहे. मी सगळ्या घटनेवर नजर ठेवून आहे. मी नागपूरच्या पोलीस आयुक्तांना आदेश दिले आहे, जे दंगा करत असतील, पोलिसांवर कारवाई करत असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. सर्वांना माझी विनंती आहे शांतता ठेवावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

______________________________________________

नागपूरमधील महाल परिसरात नेमकं काय घडलं? स्थानिकांनी सगळं सांगितलं


राज्यात एकीकडे सण उत्सवाचं वातावरण असताना नागपूरमध्ये हिंसाचाराची घटना घडली आहे. महाल परिसरामध्ये दोन गटामध्ये वाद झाला. त्यानंतर जोरदार दगडफेक आणि जाळपोळ झाली. या घटनेत स्थानिकांच्या अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, २०० ते ३०० जणांचा हा जमाव होता, त्यांनी अनेक घरांवर दगडफेक करून जाळपोळ केली, असा आरोप केला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे असलेली औरंगजेबची कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी राज्यभरात हिंदुत्वादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज सोमवारी सकाळी औरंगजेबाची कबर काढण्याकरिता शहरात सकाळी महाल परिसरातील शिवाजी पुतळा परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर संध्याकाळी याच परिसरात दोन गटामध्ये भडका उडाला.

स्थानिक लोकांनी काय माहिती दिली?

सगळी बाहेरची माणसे होती. तेही सर्व एकाच गटाचे होते. महाल परिसरात आल्यावर त्यांनी काही घरे टार्गेट करून घरांवर दगडफेक केली. बाहेर उभ्या असलेल्या गाड्या वा इतर वस्तूंची तोडफोड केली.आम्ही आजपर्यंत अशी घटना कधीच पहिली नाही, त्या 350 ते 400 लोकांच्या जमावात एकही चेहरा ओळखीचा नव्हता. आता इथे कुठलीही घटना घडू शकते अशी आम्हाला भीती होतो. आमच्यासोबत बरेचसे सहकारी जखमी झालेत, त्याचबरोबर हा माहोल बघता परिसरातील एका वृध्द स्त्री ची प्रकृती खालावली, तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती महाल परिसरात राहणाऱ्या एका स्थानिकाने प्रसारमाध्यमांना दिली आहे.

तसंच, 'या जमावाने प्लॅनिंग करून हल्ला केला. आमच्या परिसरात येऊन दगडफेक केली. ८ गाड्यांची तोडफोड केली. दोन गाड्यांच्या जाळपोळ केली. या जमावातील लोकांनी तोंडाला मास्क लावले होते. त्यांच्याकडे पेट्रोल बॉम्ब सुद्धा होते' असा दावाही स्थानिकांनी केला आहे.

सकाळी एक आंदोलन झालं पण पोलिसांनी त्यात मधस्थी केली. रात्री महाराजांचं पुतळा परिसर आणि इतर परिसर दगड फेकले, गाड्यांची जाळपोळ केली. अग्निशान दलाच्या आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे. नियोजन करून हल्ले झाले,मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात झाले आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांनी सामान्य लोकांची घर पेटवण्याचा प्रयत्न केला. आता स्थिती स्थिर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेचे आवाहन केले आहे. दोन्ही बाजूचे लोक रस्त्यावर आहेत परिसरात प्रचंड नुकसान झाले आहे ज्यांनी दगडफेक केली, त्यांच्यावर तत्काळ कारवाई करायची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. सकाळी परिस्थिती वेगळी होती नंतर प्लॅनिंग करून बाहेरून लोक आणून हे केलं, - प्रवीण दटके, आमदार, मध्य नागपूर

______________________________________________

फडणवीस-गडकरींचं शहरात जाळपोळ होतेय हे गृहविभागाचे अपयश, काँग्रेसची टीका

 नागपूरमधील महाल भागात उडालेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 'नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शहर आहे. या शहरात एवढ्या प्रमाणात तणाव निर्माण होतो. दगडफेक, जाळपोळ होते हे गृहविभागाचे अपयश आहे' अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. तसंच, 'महाराष्ट्रामध्ये अशा घटना अत्यंत निंदनीय आहे. आपण संविधानाला मानणारे लोक आहोत. सरकारमध्ये बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. जर मुख्यमंत्र्यांचं शहर जर जळत असेल तर याला काय अर्थ उरत नाही. या सगळ्या गोष्टींना नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे' अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिली.

'गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री जाणिवपूर्वक प्रप्रक्षोभक वक्तव्ये करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांना नागपूरमध्ये यश आले आहे, असं दिसतंय. नागपूर शहरात आज रात्री घडलेला दगडफेकीची घटना अनावश्यक आणि अत्यंत दुर्देवी आहे. नागपूरकरांनी शांतता राखावी अफवांवर विश्वास ठेवू नये अशी विनंती मी सर्व नागपूरवासियांना करतो. नागपूर शहरात सर्व धर्मीय लोक अत्यंत गुण्यागोविंदाने व आनंदाने रहात आहेत. नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शहर आहे या शहरात एवढ्या प्रमाणात तणाव निर्माण होतो दगडफेक, जाळपोळ होते हे गृहविभागाचे अपयश आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.

'नागपूर सामाजिक सलोखा जपणारे शहर आहे. देशाच्या इतर भागात दंगली होत असताना नागपुरात कधीही असं झालं नव्हतं. रामनवमीला हिंदू मुस्लीम एकत्रीतपणे रथ ओढतात ताजुद्दीन बाबाच्या दर्ग्यात मुस्लिमांपेक्षा जास्त हिंदू दर्शनाला जातात. राजकीय फायद्यासाठी नागपूर पेटवण्याचा डाव आपण ओळखावा आणि शांतता राखावी, असं आवाहनही सपकाळ यांनी केलं.

नागपूर मध्ये जी काही घटना घडली ती अत्यंत धक्कादायक आहे. सगळ्यांनी ही शांततेनं घेतलं पाहिजे. आपण महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो सगळ्यांनी शांततेनं घ्यायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अशा घटना अत्यंत निंदनीय आहे. आपण संविधानाला मानणारे लोक आहोत. सरकारमध्ये बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. जर मुख्यमंत्र्यांचं शहर जर जळत असेल तर याला काय अर्थ उरत नाही. या सगळ्या गोष्टींना नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. छोट्या छोट्या कारणावरून एक दुसऱ्यांना भडकवून नाही बंद झालं पाहिजे ही तंबी मुख्यमंत्र्यांनी सर्व नेत्यांना दिली पाहिजे; महाराष्ट्र जपला पाहिजे, - काँग्रेस नेत्या, यशोमती ठाकूर 

______________________________________________

नागपूरच्या घटनेला राज्य सरकार जबाबदार', ठाकरे गटाचा गंभीर आरोप

औरंगजेबाच्या कबरीवरून अवघ्या महाराष्ट्रात वातावरण तापलेलं असताना नागपूर शहरातील महाल परिसरात रात्री 8 च्या सुमारास मोठा राडा झाला. दोन समुदायाकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली आहे. तसेच वाहनांचीही मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली आहे. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, मात्र जमावाकडून पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली,

त्यामुळे महाल परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले आहेत. नागपूरमधल्या या घटनेनंतर शिवसेना ठाकरे पक्षाने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. या सगळ्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

'ज्या पद्धतीने नागपूरमध्ये वातावरण खराब झालं आहे, दंगल पेटवण्याचा प्रयत्न झाला आहे. याला राज्य सरकार जबाबदार आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. राज्याचे गृहमंत्री नागपूरचे आहेत, इकडे दंगा होतोय आणि पोलिसांना कोणत्याही गोष्टी कळत नाहीत. मागच्या महिन्यापासून राज्यभरातील वातावरण खराब करून, भांडण लावून, दंगली भडकवून स्वत:ची पोळी भाजण्याचं षडयंत्र करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे', - अंबादास दानवे 

अरविंद सावंतांचा भाजपवर निशाणा

'महाराष्ट्रातलं वातावरण आणि देशातलं वातावरण जाणीवपूर्वक वाईट वळणावर न्यायचा प्रयत्न सुरू होता, त्याची परिणीती आज नागपूरमध्ये झाली. भाजप सत्ताधारी आहे, पण त्यांचीच माणसं, त्यांचेच मंत्री ज्या पद्धतीने भडकाऊ भाषा करत आहेत, तेव्हा आज ना उद्या होईल, असं वाटतच होतं, ती भीती आज खरी ठरली', असं शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातल्या जनतेने कुणाला निवडून दिलं आहे, ते पाहावं. चुल पेटवता येत नाही म्हणून घरं पेटवली जात आहेत, हे दुर्दैव आहे, असंही अरविंद सावंत म्हणाले आहेत.

'देशातील समाजाचा सलोखा बिघडवायचा असा विडाच उचलला आहे. तुमचा मंत्री इतकं वाह्यात बोलतो तेव्हा आळा का नाही घातला? मारा, टेबलवर जामीन देतो म्हणाला, का नाही आळा घातला? बंदुकीतून गोळी सुटली, का नाही आळा घातला? तुमचे मंत्री बेबंद बोलतात, घातला का आळा? कुठल्या तोंडाने लोकांवर आरोप करता? स्वत: चारित्र्य संपन्न वागा आणि मग लोकांना बोला. या सगळ्याला तुम्ही ज्यांना सत्तेत बसवेल तेच जबाबदार आहेत,' - अरविंद सावंत, शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत