Breaking News

गावाच्या अभ्यासू मुलाचा थेट IIT पर्यंतचा प्रवास !

 विरूर स्टेशनच्या अंतरिक्ष रामटेके यांचा IIT मध्ये डंका!

कोचिंगशिवाय ऑनलाइन अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर IIT गाठलं

महा घडामोडी न्यूज शहर प्रतिनिधी, प्रवीण चिडे, विरूर स्टेशन (ता. राजुरा) : राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील अंतरिक्ष बंडू रामटेके या होतकरू विद्यार्थ्याने आपल्या जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर थेट भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) वाराणसीमध्ये प्रवेश मिळवून संपूर्ण परिसराचे नाव उज्वल केले आहे. अंतरिक्ष यांनी JEE मेन्स आणि JEE अ‍ॅडव्हान्स 2025 या दोन्ही परीक्षांमध्ये यश मिळवत देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांपैकी एक असलेल्या IIT मध्ये स्थान मिळवले.

अंतरिक्ष रामटेके यांचा शिक्षण प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षण गावातील क्राईस्ट इंग्लिश स्कूल येथे घेतले. त्यानंतर इंदिरा गांधी गार्डन स्कूल, चंद्रपूर येथे दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून, इंदिरा गांधी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, विरूर स्टेशन येथून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. या काळातच त्यांनी IIT मध्ये प्रवेश मिळवण्याचा निर्धार केला होता.

घरची आर्थिक परिस्थिती जरी प्रतिकूल असली तरीही, कोणत्याही महागड्या कोचिंग क्लासशिवाय आणि केवळ ऑनलाइन शिक्षण साधनांचा वापर करून त्यांनी हे यश संपादन केले. त्यांच्या यशात वडिलांचे मार्गदर्शन आणि घरच्यांचे पाठबळही मोलाचे ठरले.

विशेष म्हणजे, सहज म्हणून दिलेल्या CET 2025 परीक्षेमध्ये देखील अंतरिक्ष यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करत 98.30 टक्के परसेंटाईल मिळवले असून, राज्यभरात त्यांचे कौतुक होत आहे.अंतरिक्ष यांना मेकॅनिकल अभियांत्रिकी या शाखेत विशेष रुची असून, लवकरच ते IIT वाराणसीमध्ये आपले शिक्षण सुरू करणार आहेत.

या यशामुळे संपूर्ण राजुरा तालुका, विरूर स्टेशन परिसर आणि चंद्रपूर जिल्हा आनंदित झाला असून, सर्वत्र अंतरिक्ष रामटेके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या यशाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील नवे स्वप्न पाहण्याची प्रेरणा दिली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत