Breaking News

या मिळून चालवूया सायकल ! फिटनेस का डोज — आधा घंटा रोज !

वेकोलीच्या 'संडे ऑन सायकल' उपक्रमात एल.के.जी. मधील प्रभादित्यने वेधलं सर्वांचं लक्ष!

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, बादल बेले, राजुरा : वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोली), बल्लारपूर क्षेत्र अंतर्गत केंद्र सरकारच्या आदेशानुसार दर रविवारी राबवण्यात येणाऱ्या "संडे ऑन सायकल" – फिटनेस का डोज, आधा घंटा रोज या उपक्रमात यंदा एक विशेष आकर्षण ठरला तो म्हणजे एल.के.जी.मध्ये शिकणारा चिमुकला प्रभादित्य कुरला.

रविवारी आयोजित सायकल रॅलीमध्ये वेकोलीचे अनेक अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. मात्र, अवघ्या ४-५ वर्षांच्या प्रभादित्यने मोठ्यांबरोबर सायकल चालवत उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या वयात सायकल चालवण्याचा आत्मविश्वास, अंगी असलेली उत्साही ऊर्जा आणि फिटनेसबद्दलची सजगता सर्वांना थक्क करणारी होती.

प्रभादित्य केवळ सायकल चालवतोच असे नाही, तर तो राजुरा येथे पोहण्याचे प्रशिक्षण देखील घेत आहे. इतक्या लहान वयात विविध शारीरिक उपक्रमांमध्ये भाग घेत असल्याने त्याचे कौतुक सर्वच स्तरांतून होत आहे. आजच्या डिजिटल युगात लहान मुलं मोबाईल आणि स्क्रीनवर झुकलेली दिसतात, अशा वेळी प्रभादित्यसारखा मुलगा इतरांसाठी प्रेरणा बनत आहे.

या सायकल रॅलीस वेकोलीचे क्षेत्रीय महाप्रबंधक श्री. इलियास हुसैन विशेष उपस्थित होते. त्यांनी उपक्रमाचे महत्व अधोरेखित करताना सांगितले की, "फिटनेस ही केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे, तर मानसिक ताजेपणासाठीही अत्यंत आवश्यक बाब आहे. 'संडे ऑन सायकल'सारखे उपक्रम समाजात जागरूकता वाढवण्याचे उत्तम माध्यम आहेत."

कार्यक्रमात अनेक कर्मचारी, अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला. प्रभादित्यच्या सहभागाने कार्यक्रमाला विशेष गोडी आणि प्रेरणादायी स्वरूप लाभले.

फिटनेस का डोज — आधा घंटा रोज!

ही केवळ घोषणा नाही, तर आरोग्यदायी जीवनशैलीचा मार्ग आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत