Breaking News

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा सन्मान निधी वितरित होणार

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, मुंबई | राज्य सरकारतर्फे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना जुलै महिन्याचा सन्मान निधी म्हणजेच १५०० रुपये रक्कम रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे जमा केली जाणार आहे.

या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे आणि त्यांच्या आत्मसन्मानाला बळकटी देणे हा आहे. यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे.

 "रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी बहिणींना जुलै महिन्याचा सन्मान निधी वितरित केला जाणार आहे. या निर्णयामुळे बहिणींना सणाच्या काळात आर्थिक आधार मिळेल," असे त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या.

ट्विट पहा: https://x.com/iAditiTatkare/status/1951284399707725832?t=jWG8NG4LuR-A0qtlrRPdeg&s=19

या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

योजनेविषयी महत्त्वाचे मुद्दे:

  • योजनेचे नाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण
  • सन्मान निधी : ₹1500 प्रति महिना
  • पात्रता : शासनाच्या निकषांनुसार निवडलेली महिला लाभार्थी
  • वितरणाची वेळ : रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस (ऑगस्ट २०२५)
  • पद्धत : थेट बँक खात्यावर निधी जमा (DBT प्रणालीद्वारे)

राज्यभरात लाखो महिलांना या योजनेतून दरमहिना आर्थिक सहाय्य दिले जात आहे. रक्षाबंधनासारख्या सणाच्या पूर्वी सन्मान निधी मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलणार असून, ही योजना त्यांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरते आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून, "लाडक्या बहिणींच्या सन्मानार्थ" ही योजना एक स्तुत्य उपक्रम ठरत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत