बेला पोलिसांची विशेष मोहीम: ग्रामभेटींच्या माध्यमातून अवैध धंद्यांवर कडक कारवाई
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, बेला : नागपूर ग्रामीण पोलिस दलाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत, बेला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विविध गावांमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ग्रामभेटी घेऊन अवैध धंद्यांवर अंकुश लावण्याच्या उद्देशाने जनजागृती केली. या मोहिमेचे नेतृत्व पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के, सहाय्यक पोलीस अधीक्षक दीपक अग्रवाल आणि ठाणेदार चेतनसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण यांनी केले.
या विशेष मोहिमेअंतर्गत माहलगाव, सिर्सी, रामा, आष्टा, सोनेगाव अशा बिटअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या. ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात जागरूक करण्यात आले. पोलिसांबद्दल भीती न बाळगता कोणत्याही अडचणी किंवा समस्यांसाठी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी यावेळी केले.
तसेच, सध्या वाढत चाललेल्या ऑनलाईन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांबाबतही नागरिकांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. मनी ट्रान्सफरच्या माध्यमातून घडणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे तसेच कोणताही अनोळखी व्यक्ती गावात संशयास्पद वाटल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.
या मोहिमेच्या दरम्यान पोलिसांनी कारवाई करत दारूबंदीचे तीन गुन्हे आणि जुगार बंदीचे दोन गुन्हे दाखल केले. या कारवाईत एकूण 3,720 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. हे सर्व गुन्हे तात्काळ नोंदवून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.
गावात शांतता, सुरक्षितता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने बीट जमादार दारासिंग राठोड, प्रवीण नयनवार, अमोल काळे, सोनू चटप आणि इतर पोलीस कर्मचारी सतत गस्त घालून परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आहेत. अशा मोहिमा भविष्यातही सातत्याने राबविण्यात येणार असून पोलिसांचा गावकऱ्यांशी थेट संवाद वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
ही विशेष मोहीम केवळ कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी नव्हे, तर नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरत आहे. ग्रामीण भागातील जनतेनेही यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने पोलिसांचा हा उपक्रम अधिक यशस्वी होत आहे.
बातमी संकलन - दिनेश गोळघाटे, बेला




कोणत्याही टिप्पण्या नाहीत