Breaking News

माणिकगड किल्ल्यावर गुप्तधनासाठी जेसीबीने खोदकाम

 माणिकगड किल्ल्यावर गुप्तधनासाठी जेसीबीने खोदकाम

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर, जिवती : तालुक्यातील ऐतिहासिक माणिकगड किल्ला, जो पर्यटनस्थळ म्हणून घोषित झाला आहे, येथे शनिवार-रविवार व इतर दिवशी असंख्य पर्यटक व विद्यार्थी येऊन किल्ला पाहतात. मुख्य गेटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांना पास दिला जातो, आणि गेटमधून आत गेल्यानंतर संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी परवानगी मिळते.

माणिकगड किल्ल्यावर रेती, गिट्टी, दगड व चुनखडी वापरून बांधकाम करताना ट्रॅक्टर, जेसीबी किंवा इतर वाहनांना किल्ल्यावर नेण्याची परवानगी नाही. करोडोंची कामे झाली असली तरी साहित्याची ने-आण गाढव्यांद्वारे केली जाते. त्यामुळे जेसीपीचा वापर करण्यासाठी स्थानिक कर्मचारी सहकार्य करत असल्याचे सर्वांनाच संशयास्पद वाटत आहे.

मुख्य गेटपासून सुमारे १००-१५० फूट अंतरावर दुसरा गेट आहे. या गेटच्या डाव्या बाजूला पंधरा दिवसांपूर्वी सबल टीका, पावडे या माध्यमातून खोदकाम करण्याचा प्रयत्न झाला. त्या वेळी किल्ल्यावर जाणारे व पर्यटकांना गाईडलाइन करणारे कर्मचारी या खोदकामाच्या दृश्यास सामोरे गेले. त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरावर पांढरी सिमेंटची पिशवी बांधलेली दिसली.

नंतर चार-पाच दिवसांनी रात्री जेसीपी आणून १५-२० फूट खोदकाम करण्यात आले, ज्यात मोठे दगड असल्यामुळे जेसीपीचा वापर झाला. खड्डा काही प्रमाणात बुजवण्यात आला आहे. खोदकामाच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती आणि इतर प्राचीन मुर्त्या होत्या, कदाचित त्या मूर्त्यांच्या खाली गुप्तधन असल्याची माहिती संबंधित व्यक्तींना असावी.

संदिग्ध सहकार्य व नियोजन

  • किल्ल्यावर मोठ्या मशीनचा वापर स्थानिक कर्मचार्‍यांशिवाय शक्य नाही.
  • मुख्य गेट बंद असतो, पर्यटक व बाहेरील वाहन प्रवेश करु शकत नाहीत, तसेच हातात हत्यार किंवा इतर वस्तू घेता येत नाहीत.

या खोदकामाबद्दल वनरक्षकांना माहिती मिळाल्यानंतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा समितीला कळवली गेली नाही, ज्यामुळे गुप्तधन काढल्याची शंका निर्माण झाली.

स्थानिक व बाहेरील व्यक्तींमार्फत गुप्तधन काढल्याची माहिती जुने जाणकार करत आहेत. समिती अध्यक्ष श्री नानाजी मडावी यांनी २० सप्टेंबर २०२५ रोजी जिवती पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. तसेच वनपरिक्षेत्राधिकारी, तहसीलदार, डीएफओ, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व पुरातत्त्व विभाग यांनाही निवेदन सादर केले जाणार आहे. जे कोणी दोषी असेल त्याची चौकशी करावी व संबंधित वनविभागाचे कर्मचारी व नागरिकांवर कडक कारवाई व्हावी, असे समितीने तक्रारीत सांगितले आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी श्री संदीप लंगडे म्हणतात, “माझ्या माहितीनुसार संबंधित दोषींवर वरिष्ठांकडून रीतसर कारवाई केली जाईल.”

समितीचे म्हणणे: “किल्ल्यावर खोदकाम केल्याची माहिती कर्मचार्‍यांनी वनरक्षकांना दिल्यानंतरही वरिष्ठ अधिकारी किंवा समिती पदाधिकाऱ्यांना सांगितले नाही, त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशन व सर्व विभागांना तक्रारी दाखल केल्या आहेत,” असे श्री नानाजी मडावी, अध्यक्ष संयुक्त वन व्यवस्थापन समिती मारोतीगुडा यांनी सांगितले.

सावधगिरीचा संदेश – अंधश्रद्धा टाळा

माणिकगड किल्ला हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. येथे कोणतेही अवैध खोदकाम किंवा गुप्तधन शोधण्याचे प्रयत्न चालू ठेवू नयेत. पर्यटक आणि स्थानिकांनी नियमांचे पालन करावे, वन विभाग आणि प्रशासनावर विश्वास ठेवावा.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत